प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर
गुरुपौर्णिमा व नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न
⚡बांदा ता.०६-: “जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करण्याची क्षमता निर्माण करतो तो गुरु. मानवी जीवनात अनेक घटकांच्या माध्यमातून गुरुचे स्थान लाभत असते. बिन भिंतीची शाळा जगायला शिकवते. निसर्गाच्या साऱ्या जाणीवा माणसाला धडा देत असतात. गुरुपरंपरेचा हा वारसा भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून चालत आलेला आहे. शिस्त, ध्येये, आत्मविश्वास, एकता, शिक्षण, राष्ट्रीयत्वाची भावना शिक्षणातून रुजत असते आणि हे देणारे आपले गुरु एक संस्कारक्षम समाजाची निर्मिती करीत असतात. म्हणून गुरूंचा सन्मान हा समाज निर्मिती करणाऱ्या घटकांचा सन्मान आहे असे प्रतिपादन प्रा डॉ एम एन वालावलकर यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित गुरुपौर्णिमा व नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ असा संयुक्त कार्यक्रम संपन्न जाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस.पी. वेल्हाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एन.डी. कार्वेकर यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ म्हणाले की, भारतीय संस्कृतीला फार मोठी परंपरा आहे. ऋषीमुनींच्या या देशात महर्षी व्यासांनी निर्माण केलेला महाभारत हा ग्रंथ नीतिमूल्ये, व्यवहार ज्ञान, धर्मशास्त्र, अर्थनीती शिकवतो.अनेक व्यक्तिरेखांच्या वृत्ती प्रवृत्तींची मांडणी या ग्रंथात केलेली आहे. हीच वृत्ती प्रवृत्ती आज सुद्धा समाजात आहे. वैचारिक मूल्यांची पेरणी करणाऱ्या व्यासांचा जन्मदिन आज गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. परंपरेचा वारसा व वसा जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. आधुनिक पिढीला आपल्या गुरुचे जीवनातील स्थान समजणे आवश्यक आहे. आई, वडील, शिक्षक, निसर्ग व समाज हे खरे आदर्श गुरू आहे. यावेळी प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभागामार्फत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची सविस्तर माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी विली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु विषयीच्या आदरयुक्त भावना कु. यतीन फाटक व कु. गार्गी विर्नोडकर या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले. तर आभार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. उमेश परब यांनी व्यक्त केले.
