ऐन बाजारादिवशी एसटीच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार
⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यातच कुडाळच्या बाजारादिवशी कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसून आले. यामुळे बाजारासाठी कुडाळ शहरात येणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सह्याद्रीच्या नजीक असलेल्या गावातून कुडाळमध्ये बाजाराला येणाऱ्या नागरिकांची संख्या आज जास्त होती. परंतु, कुडाळ एसटी आगारातून आज ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या मार्गस्थ झाल्या नाहीत.
याबाबत, कुडाळ एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी वाहक – चालकांच्या ड्युटीचे दररोजचे नियोजन बदलण्यात आले. पण याबाबत आगार व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते.
ड्युटीचे नियोजन बदलल्याने चालक-वाहक आपली नियोजित
ड्युटी करून रीबुक झाले नाहीत. त्यामुळे कुडाळ एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले. आज
पणजी, वेंगुर्ले, रांगणातुळसुली, कणकवली, कर्ली, निवती, कोचरा, मालवण आदी या कुडाळ एसटी आगाराच्या फेऱ्या मार्गस्थ झाल्या नाहीत. एकंदरीत एसटी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
