काळसे येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प…

⚡मालवण ता.०५-: मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज काळसे आणि धामापूर गावाला अतिवृष्टीचा फटका बसला असून आज दुपारनंतर काळसे रवळनाथ मंदिर नजीक असलेल्या ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मालवण – धामापूर – कुडाळ या मुख्य मार्गावर रवळनाथ मंदिर नजीक असलेल्या सखल भागामध्ये दुपारी ३ वाजल्यानंतर पुराचे पाणी भरले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

काळसे रवळनाथ मंदिर नजीक असलेला ओढा गाळाने भरला असून येथील साकवही खूप छोटा आहे. त्यामुळे त्यातील पाईप मधून पुराच्या पाण्याचा मोठा प्रवाह जाण्यात अडथळे निर्माण होतात त्यामुळे दरवर्षी लगतच्या सखल भागात थोडा पाऊस झाला तरी पाणी भरते आणि रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर साकवाची उंची वाढवून रस्त्याचीही उंची वाढवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ओढ्यातील गाळ काढून त्याची खोली वाढवल्यास भविष्यात ही समस्या उद्भवणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले

You cannot copy content of this page