⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला येथील बहुसंख्य विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात, खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करीत कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी दिडी काढण्यात आली. भर पावसातून आलेल्या या दिडीचे मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले.
वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली विठुरायाची पायीवारी आज आषाढी एकादशी दिवशी सलग चौथ्या वर्षीही त्यांच्या मित्र परिवारांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर असलेल्या केळूस-कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात नेण्यात आली. या वारीत बहुसंख्य विठ्ठल भक्त सहभागी झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे. सुमारे १८ किलोमीटरचा हा पायी प्रवास करून सहभागी झालेल्या भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले.
