वंदे भारत एक्सप्रेस केवळ गोव्याची आहे का… भाषेबाबत दुजाभाव कशासाठी…?

परशूराम उपरकर यांचा सवाल; सावंतवाडी येथेही वंदे भारतला थांबा द्या

⚡कणकवली ता.२९-: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेबरोबरच गोवन भाषेतूनही सुचना दिल्या जात आहेत. गोवन भाषेचा वापर करून दुजाभाव करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे त्यामुळे या एक्सप्रेसमध्ये सिंधुदूर्गची मालवणी भाषा आणि रत्नागिरीच्या कोकणी भाषेतूनही सूचना देण्यात याव्यात अशी मागणी रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस माजी आमदार परशूराम उपरकर यांनी दिली. सिंधुदुर्गात कणकवली बरोबरच सावंतवाडी येथेही वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खाद्य पदार्थबाबत चुकीच्या पद्धतीने दर आकारले जात असल्याने आपण या बाबत लक्ष वेधणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले.

कणकवली येथे मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशूराम उपरकर बोलत होते.

वंदे भारत एक्सप्रेस आपल्याच पक्षाने सुरू केल्याचा अविर्भाव काही राजकीय पक्ष आणत असून फलक लावून स्वागत करत आहेत .मात्र या लोकांनी मुंबई ते कणकवली प्रवास करून पहावा मग वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाषेबाबत केला जाणारा दुजाभाव, खाद्याबाबत होत असलेली लूट या गोष्टी लक्षात येतील. असे सांगताना परशुराम उपरकर म्हणाले, कोकण रेल्वेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील लोकांनी आपल्या किमती जमिनी दिल्या. काही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या मात्र बहुतांशी प्रकल्पग्रस्त अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोकणवासीयांनी योगदान दिले नसते तर कोकण रेल्वे साकारलीच नसती असे असताना कोकण वासियांवर अन्याय कशासाठी? असा सवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही केवळ गोव्याची आहे का ?असा सवाल करताना उपरकर म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेसमधून मुंबई ते कणकवली प्रवास केला. यादरम्यान या एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदी, इंग्रजी आणि मराठी बरोबरच गोवन भाषेतून दिले जातात. त्यामुळे ही ट्रेन गोव्यासाठी चालू केली आहे का असे सांगताना ते म्हणाले, या ट्रेनमध्ये मालवणी आणि कोकणी भाषेच्या अंतर्भाव करावा अशी मागणी आपण करणार आहे. भाषेबाबत रेल्वे दुजाभाव करीत असेल तर ते चुकीचे आहे असे सांगताना ते म्हणाले ,रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात या एक्सप्रेसला दोन थांबे आहेत. सिंधुदुर्गातही कणकवली बरोबरच सावंतवाडी येथेही थांबा दिल्यास सावंतवाडी वेंगुर्ले व कुडाळचा काही भाग यांना प्रवास सोयीचा होईल .त्यामुळे सावंतवाडीला थांबा द्यावा अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये नाश्त्यासाठी 157 रुपये दर आकारला जात आहे. यामध्ये चहा, बिस्किट, आमलेट, थंडा, चिवडा याचा समावेश आहे. मात्र जे साहित्य दिले जाते त्याची किंमत 157 रुपये होते का? याचा विचार करावा तसेच प्रवास करताना आगाऊ सूचना न दिल्यास या पदार्थांसाठी एमआरपी पेक्षा जास्त 50 रुपये आकारण्याबाबत जे परिपत्रक काढण्यात आले आहे हे योग्य आहे का? याबाबतही लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेचे हस्तांतरण इंडियन रेल्वेकडे न झाल्याने 30 टक्के जास्त तिकीट दर सहन करावा लागत आहे ही प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वे तिकीट दर ,वंदे भारत एक्सप्रेसमधील खाद्य दर, भाषेबाबत दुजाभाव हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी लक्ष वेधण्यात असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page