वेंगुर्ला ते कालवीबंदर पायीवारी २९ रोजी

⚡वेंगुर्ला ता.२७-: वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली विठुरायाची पायीवारी सलग चौथ्या वर्षीही त्यांच्या मित्र परिवारांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर असलेल्या केळूस-कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात २९ जुन रोजी देवशयनी आषाढी एकादशीला जाणार आहे.

  पांडुरंगाच्या कृपेने जेवढी वर्षे पायीवारी करणे शक्य आहे तेवढी वर्षे पायीवारी चालू ठेवण्याचा बाबू झांट्ये ह्यांच्या मित्रपरिवारांचा मानस आहे.याहीवर्षी विठुरायाच्या वारीचा आनंद सोहळा हा जवळ आला असून त्यासाठी वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका येथून पांडुरंगाचे लाडके भक्त अनवाणी, १८ किलोमीटरचा पायी प्रवास करून विठुरायाच्या गोड नामाच्या गजरात प्रतिपंढरपूर असलेल्या कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाईच्या मंदिराकडे जाणार आहेत.

  हे भक्त मोठ्या भक्तिमय उत्साहात भजन किर्तन करत येतात. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये भक्तीरुपी रस प्राशन करण्यासाठी व भक्तीचा आनंद लुटण्यासाठी सर्व इच्छुक भक्त मंडळीनी सहभागी व्हावे, असे आवाहन पायीवारीच्या आयोजकांनी केले आहे.
You cannot copy content of this page