अनिल शिर्के ; गुप्ते वाळके महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती
⚡बांदा ता.२७-: शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. शिक्षणापासून सामाजिक उन्नती साधता येते. हे ओळखून छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडात गोरगरीब जनतेच्या शिक्षणाला महत्त्व दिले. आजच्या कालखंडात हा वारसा जपायचा असेल तर लोकशाहीचे महत्त्व जाणले पाहिजे. सामाजिक न्याय व सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान समकाळात समाजव्यवस्थेपुढे आहे. यासाठी सामाजिक समता, सलोखा सहिष्णुता कशी नांदेल याचा विचार करणे म्हणजेच छत्रपती राजश्री शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल. असे प्रतिपादन ग्रंथपाल अनिल शिर्के यांनी सामाजिक न्यायदिनाच्या कार्यक्रमात काढले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालय बांदाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती व एनएसएस विभागाच्या विविध उपक्रमांचा कार्यारंभ समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून शिर्के बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख के.के. मैत्री यांनी केले. यावेळी एनएसएस विभागाच्या वर्षभरातील उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर म्हणाले की, बहुजन समाजाच्या विद्येचे माहेरघर म्हणून कोल्हापूर या संस्थानाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दूरदृष्टी ठेवून छत्रपती शाहू महाराजांनी विविध समाजांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती केली. अनेक जातीतील माणसे शिकून मोठी झाली, याचे श्रेय राजश्री शाहू महाराजांना द्यावे लागेल. आदर्श लोकराजा कसा होता असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू सोपोर. आज सामाजिक व्यवस्थेत हिंसा, धार्मिक हल्ले होत आहेत. कारण ते आपल्या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास विसरत आहेत. आजच्या समाजात सामाजिक समता, बंधुता निर्माण होण्यासाठी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणे अपरिहार्य आहे. यावेळी माजी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. पी. वेल्हाळ यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार एनएसएस विभागाच्या सदस्य आर. एम. काजरेकर यांनी व्यक्त केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी केले.
