बांदा उड्डाणपुलाचे सुरू केलेले काम शिवसेनेकडून रोखले…

आराखडा बदलल्याने साईप्रसाद काणेकर यांचा आक्षेप…

⚡बांदा ता.२६-: स्थानिक प्रशासनाला तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता आराखडा पूर्णपणे बदलून बांदा उड्डाणंपुलाचे काम सुरु करण्यात आल्याने आज शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी आक्षेप घेत काम बंद पाडले. आपला उड्डाणंपूल कामाला विरोध नसून स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी महामार्ग अधिकारी, ठेकेदार, ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी श्री काणेकर यांनी केली आहे.


बांदा उड्डाणंपुलाच्या कामास गेल्या सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. सध्या महामार्गावर पिलर टाकण्यासाठी खोदाई सुरु करण्यात आली आहे. याबाबत स्थानिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर साईप्रसाद काणेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख भय्या गोवेकर, नितेश पेडणेकर, हेमंत दाभोलकर, मिलिंद सावंत यांनी घटनास्थळी येत ठेकेदार यांना जाब विचारला. मात्र यावेळी उड्डाणंपूलाचा बदललेला आराखडा स्थानिक प्रशासनाला न देता तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीने काम सुरु केले असा सवाल उपस्थित केला.
बदललेल्या आराखड्यानुसार पिलरची संख्या, पाणी निचाऱ्याचे व्यवस्थापन, बाजूपट्टीकडे वाहणाऱ्या नाल्याचे नियोजन याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना देण्यात न आल्याने काणेकर यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबतचा आराखडा सरपंच यांना दिल्याचे ठेकेदार यांनी सांगितले. यावर काणेकर आक्रमक होत याबाबत संयुक्त बैठक तात्काळ घेण्याची मागणी केली. तसेच जोपर्यंत बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा ईशारा दिला.

You cannot copy content of this page