सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात ट्रॉलर व्यवसायिकांनी मांडली डिझेल परताव्याची व्यथा

⚡मालवण ता.२६-: डिझेल परताव्याचे हक्काचे पैसे मच्छिमारांच्या हाती येण्यास वारंवार विलंब होतोय. परतावा मंजूर झाला, तरी त्यात सिंधुदुर्गचा वाटा अत्यल्प असतो. जून महिन्यात जिल्ह्यासाठी केवळ ३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अशा परिस्थितीत ट्रॉलर व्यावसायिकांनी मासेमारी बंदी कालावधीत नौका आणि इंजिनची देखभाल-दुरुस्तीची कामे करायची कशी, अशी कैफियत सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात राजकोट मच्छीमार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष खंदारे यांनी मांडली.

नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमार सहकारी संस्थाध्यक्ष तसेच संचालकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुसऱ्या दिवशी मालवण तालुक्यातील एक मोठी मच्छीमार सहकारी संस्था म्हणून दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सहकारी संघ मुख्याधिकारी मंगल भोईर, कोल्हापूर सहकारी विकास अधिकारी एस. टी. जाधव आणि कोल्हापूर सहकार प्रशिक्षण केंद्र प्राचार्य एस. एस. ढेरे यांनी दांडी आवारवाडी येथील श्री देव रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेला भेट दिली. यावेळी खंदारे यांनी प्रलंबित व अपुऱ्या परताव्या अभावी निर्माण होत असलेल्या अडचणींचा मुद्दा सुमारे चार कोटी रुपयांची गरज असताना जूनमध्ये केवळ ३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अद्याप ३ कोटी ५५ लाख रुपये प्रलंबित आहेत. जर ही रक्कम एकाचवेळी मंजूर झाली असती, तर आज नौका आणि इंजिन दुरुस्तीच्या कामांना वेग आला असता. अगोदरच विविध कारणांनी ट्रॉलर व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी परताव्याची सर्व रक्कम पुढील टप्प्यात तातडीने मंजूर होणे आवश्यक असल्याचे खंदारे म्हणाले.

यावेळी रामेश्वर सहकारी संस्थाध्यक्ष जगदिश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी, सचिव संचालक जीवन , भगत, रवींद्र चांदेरकर, प्रवीण मेस्त, रुपेश साळगावकर, संतोष ढोके, तुषार आचरेकर, संचालिका अर्चना आचरेकर, सर्जेकोट मच्छीमार संस्था अध्यक्ष सदानंद सारंग, सचिव आनंद केळुसकर, संचालिका भारती आडकर, सागरकन्या महिला सहकारी संस्थेच्या सुलक्षणा रेवंडकर, रवींद्र रेवंडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page