⚡कुडाळ ता.२६-: मागील वर्षी महामार्गावरील पावशी-घावनळे मार्ग जोडणाऱ्या बॉक्सवेलमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत महामार्ग ठेकेदार कंपनीला अनेकदा जाब विचारण्यात आला. अखेर चार महिन्यांपूर्वी या बॉक्सवेलमधील आणि रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. परंतु, यावर्षी पुन्हा तोच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाला असून बॉक्सवेलमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पुन्हा मागील वर्षीची स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या निचरा होत नसल्याने चिखलातून वाहने हाकावी लागत आहेत. मुसळधार पावसात येथे तलावसदृश स्थिती होत आहे. यामुळे वाहनधारकांना पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या बॉक्सवेलमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग करणे आवश्यक आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीने या बॉक्सवेलचे काम निष्काळजीपणे केल्याचा आरोपही नागरिकांमधून होत आहे.
