शहरप्रमुख बाबी जोगी यांची टीका : वैभव नाईक यांच्या कार्याने सर्वसामान्य समाधानी
⚡मालवण ता.२५-: आमदार वैभव नाईक यांनी गेल्या नऊ वर्षात केले ते तुमच्या नेत्यांना मागील २५ वर्षात जमले नाही. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या जनतेचे पंचनामे करून घेण्यात आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते दबाव आणत होते असे जर तुमचे म्हणणे असेल तर आम्ही किती निधी आणून दाखविला हे तुम्ही पाहिले. ही नुकसान भरपाई केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाही तर सर्वसामान्य नुकसानग्रस्तांना मिळाली. यात तुमच्या पक्षाच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनीही लाभ घेतला आहे याची माहिती घ्यावी अशी टीका विजय केनवडेकर यांच्यावर ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी पत्रकातून केली आहे.
तोक्ते वादळात जेवढी नुकसान भरपाई मिळाली तेवढी मदत यापूर्वी कधीही मिळाली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा शिवसेनेमुळे व आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच मिळाला हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याबद्दल केनवडेकर यांचे श्री. जोगी यांनी आभार मानले आहेत.
आमदार वैभव नाईक मालवणची वादळानंतरची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत मालवणमध्ये आठ दिवस ठाण मांडून होते हे सुद्धा जनतेने पाहिले आहे तसेच तुमचे नेते त्यावेळी कुठे होते हे सुद्धा जनतेला माहित आहे. केनवडेकर तुम्ही आमच्या खासदार, आमदार यांची चिंता अजिबात करू नका. कोण कोणाच्या पायाखालची वाळू सरकवतो हे येणाऱ्या निवडणुकीत जनताच दाखवून देईल. त्यामुळे तुम्ही ज्या वाळू विषयात लक्ष घालता तोच वाळू विषय सांभाळावा. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नादी लागू नका ते तुम्हाला पुरून उरतील अशी टीकाही श्री. जोगी यांनी केली आहे.
कोविड काळात तुमच्या नेत्यांच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांवर मोफत उपचार झाले व कोणत्या कार्यकर्त्याचे निधन झाले. त्यावेळी त्यांचा मृतदेह पैसे भरल्याशिवाय देत नव्हते हे तुम्हाला ठाऊक आहे. संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे कोविड काळात कोणी सहकार्य कोणाला केले हे जनतेला माहित आहे असेही श्री. जोगी यांनी म्हटले आहे.
