व्ही एन नाबरं इंग्लिश मिडीयम प्रशालेने केले कौतुक
बांदा/प्रतिनिधी
व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेतून दहावीत शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली तन्वी प्रशांत बांदेकर ही विद्यार्थिनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्रशालेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
तन्वी हिने इंजिनियरिंग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित व कठीण समजली जाणारी परीक्षा केवळ पास न होता तन्वी जिल्ह्यात प्रथम व देशात १५७३ वा क्रमांक प्राप्त करून जी कामगिरी केली आहे. या सोनेरी क्षणाचं औचित्य साधून प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेत एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम मुलाखत पद्धतीने घेतला गेला. यात विद्यार्थ्यांनी तिला विविध प्रश्न विचारले त्यांच्या शंकांच़े निरसन करताना तन्वी म्हणाली की, आपला अभ्यास प्रामाणिकपणाने केला पाहिजे. अभ्यास करत असताना लक्ष हा फक्त अभ्यासावरच असावा. हे सांगत असताना वेळेच्या वेळी अभ्यास केला की परीक्षेच्या वेळी खूप अभ्यास करावा लागत नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना तिने सांगितले की, पहिल्या दिवसापासून अभ्यास करा म्हणजे परीक्षेच्या अगोदर गडबड होणार नाही. इतर विद्यार्थांना आपला अनुभव कथन करताना तन्वी आपल्या यशाचं श्रेय शाळेलाच देते. ती पुढे म्हणाली की, यशाची शिखरं गाठत असताना वेळोवेळी आपल्याला शिक्षकांचा वाटा हा मोलाचा असतो. शिक्षकांचा हा आदर्श पुढ्यात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा.
यावेळी प्रशालेच्या मुख्यध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी शाळेच्या वतीने तिचा सत्कार केला. त्यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तिचे पालक प्रशांत बांदेकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
