वादळात भाजप कुठे होते ? याचे उत्तर जनताच देईल

मालवण (प्रतिनिधी)

तौक्ते वादळामुळे दहा दिवस मालवणात अंधार असताना लोकांना वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते स्वतः कार्यरत होते, स्वतः वीज पोल ट्रॅक्टरद्वारे घेऊन येत होते, देवबाग मध्ये गरजूना पत्रे, कौले, ताडपत्री वाटत होते, पाणीपुरवठा करत होते. त्यामुळे वादळात फक्त शिवसैनिकच काम करत होते, असे भासवणाऱ्या शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना वादळात भाजप पदाधिकारी कुठे होते ? याचे चांगले उत्तर जनताच देईल. वादळातील नुकसानग्रस्त सर्वसामान्य जनतेला नुकसान भरपाई मिळवून न देता आपल्याच शिवसेना कार्यकर्त्यांच्या नुकसान भरपाईचे खोटे पंचनामे करून लाखोंची नुकसान भरपाई मिळवून देणाऱ्या हरी खोबरेकर यांनी वादळाच्या विषयावरून राजकारण करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, अशी जोरदार टीका भाजपचे व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

देवबाग येथील वीज समस्यांवरून तेथील ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर भाजप व शिवसेना ठाकरे गट यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. तौक्ते वादळात देवबागसह मालवणात मोठी वीज समस्या उद्भवली असताना तेव्हा भाजपचे पदाधिकारी कुठे होते असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करत भाजपवर टीका केली होती. या टिकेला आज विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे आदी, आबा हडकर, ललित चव्हाण, प्रमोद करलकर व इतर उपस्थित होते.

यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, तौक्ते वादळात भाजप कार्यकर्ते जमिनीवरच होते. तौक्ते वादळानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्याच कार्यकर्त्यांचे नुकसानीचे खोटे पंचनामे केले. देवबाग मध्ये एकाच घरात तीन सदस्यांच्या नावावर नुकसानी दाखवून तिघांना नुकसान भरपाई दिली गेली. भाजपने असा प्रयत्न कधीच केला नाही. वादळात भाजप कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी कार्यरत होते. ज्यांचे खरेच नुकसान झाले त्यांना दमडीही मिळाली नाही. या बाबतच्या अनेक तक्रारी भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे आल्यावर त्यांनी नुकसान ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले, असेही केनवडेकर म्हणाले.

मालवणातील भूमिगत वीज वाहिनी बद्दल बोलणाऱ्या हरी खोबरेकर यांना हा प्रकल्प कोणी आणला हेच माहिती नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम या प्रकल्पबाबत जाणून घ्यावे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी हा प्रकल्प दिन दयाळ उपाध्याय योजनेतून मंजूर केला होता. २९८ किमी लांबीची ही योजना खासकरून मालवणसाठी मंजूर झाली होती. मात्र या योजनेला त्यावेळी नगरसेवक असणारे मंदार केणी, महेश जावकर यांनीच विरोध केला होता. तर तत्कालीन शिवसेनेतच असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सत्तेत असताना यातील १५० किमी लांबीच्या कामाचा निधी सावंतवाडीत वळवला. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत मालवण शहरात आतापर्यंत केवळ मेढा भागातच भूमिगत वीज वाहिनीचे काम होऊ शकले. तेव्हा हरी खोबरेकर झोपले होते काय ? असा सवालही केनवडेकर यांनी उपस्थित करत भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पात आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांचे कोणतेही योगदान नाही, असे सांगितले.

तसेच गेली नऊ वर्षे आमदार असलेले वैभव नाईक देवबाग, तारकर्ली येथील वीज समस्या का सोडवू शकले नाही ? हरी खोबरेकर यांनी विकासाच्या कामात राजकारण करू नये, विकास कामांच्या आड येऊन केवळ प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदा घेऊ नये, अशी टिकाही केनवडेकर यांनी केली.

You cannot copy content of this page