निर्मलकुमार सुराणा ; कुडाळ – मालवण विधानसभा संघाची बैठक संपन्न
कुडाळ, प्रतिनिधी-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीशील बनविण्याचे काम केले असून जगात भारताचे चित्र मागील ९ वर्षात बदलले आहे. मागील ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या. याद्वारे भारतातील गरीब जनतेचा विकास होण्यासाठी मदत मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी@9 हे संपर्क अभियान सुरू केले आहे. या संपर्क अभियानातून देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे माजी मंत्री तथा मोदी@9अभियानाचे संपर्कप्रमुख निर्मलकुमार सुराणा यांनी केले आहे. कुडाळ – मालवण विधानसभा संघाची बैठक निर्मलकुमार सुराणा यांच्या मुख्य उपस्थित पार पडली.
त्यानंतर ते आज कुडाळ (पिंगुळी) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संपर्कप्रमुख निर्मलकुमार सुराणा म्हणाले की, गरिबांसाठी पंतप्रधान मोदींचे कार्य विशेष असून प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन योजना, आरोग्य विषयक योजना राबविल्या. तसेच वंदे भारत ट्रेन, महामार्ग निर्मिती याद्वारे प्रवास जलद झाला. म्हणजेच गरीब जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मागील ९ वर्षात देश आर्थिक संरक्षण असो आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यामुळे या मागील ९ वर्षातील पंतप्रधान मोदींच्या कामांचा प्रचार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी १ जून ते ३० जून या कालावधीत मोदी @9 हे अभियान सुरू करण्यात आले आहे. आज देश ज्या गतीने पुढे जात आहे त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देणे महत्त्वाचे ठरेल. या अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन आमचे कार्यकर्ते मोदींचे कार्य पोहोचवणार आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने ९०९०९०२०२४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देवून या अभियानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन संपर्कप्रमुख निर्मलकुमार सुराणा यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, २०१४ ते २०२३ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेसाठी विकासाचे पाऊल उचलले. २०१४ पूर्वीची भारताची स्थिती होती ती आत्ता दिसून येत नाही. २०१४ नंतर देशात विकासाचे वारे वाहू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य जनतेपर्यंत अनेक योजना राबविल्या. त्यामुळे आज भारत जागतिक स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण करू शकला आहे. नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या महत्त्वपूर्ण योजना सामान्य जनतेसाठी राबविल्या त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख सर्वजण सहभागी होतील, अशी माहिती तेली यांनी दिली.
