तोंडवळी गावाला आपत्तीपासून वाचवा;ग्रामस्थ नरेंद्र मेस्त यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील तोंडवळी गावच्या तळाशील वाडीच्या तिन्ही बाजूला पाणी असल्याने अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीवेळी वाडीत नदी किंवा समुद्राचे पाणी पाणी घुसून धोका पोहचण्याची शक्यता आहे. नदी किनाऱ्याकडून जास्त धोका असल्याने नदी पात्रातील गाळ काढणे आवश्यक असून ड्रेझर द्वारे नदी पात्रातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थ नरेंद्र मेस्त यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तोंडवळी मधील तळाशिल वाडीमध्ये अल्पभुधारक लोक वस्ती असुन मच्छिमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. मत्स्यदुष्काळ समस्ये बरोबर आता नैसगिक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. तोंडवळीच्या एका बाजूने वाहणाऱ्या नदी मधील वाळू व गाळ ड्रेझर द्वारे उपसून किनारी काढून मिळावी अशी सुमारे १९९० सालापासून तोंडवळी गावातील तळाशित वाडीची महत्वाची मागणी आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा अधिकारी कार्यालय पर्यंत वेळोवेळी तसेच आमदार ते पालकमंत्री सिधुदुर्ग यांच्यापर्यंत ग्रामसभा ठराव, निवेदन दिलेली असून अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. नदी, खाडी व समुद्र यामुळे तळाशिल वाडीच्या तिन्ही बाजुला पाणी असल्यामुळे तसेच वेळोवेळी नैसर्गिक होणार्या चक्रिवादळामुळे तळाशिल वाडीला पाण्याचा धोका पोहचून जिवितहानी होण्याची शक्यता आहे, असे नरेंद्र मेस्त यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच तळाशील मध्ये समुद्र व नदी यामध्ये २० मीटर एवढे अंतर राहिलेले आहे. तेथील बाळा पेडणेकर नरेंद्र मेस्त यांच्या घरात पर्यंत अतिसंवेदनशील भाग राहिलेला आहे, या बाबतचा ग्रामपंचायत ठराव असुन वरिष्ठ कार्यालयात दाखल आहे. दि. १६/०५/२०२१ चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार मालवण यांनी दि. २७/०५/२०११ रोजी तळाशीलची पाहणी केली होती. ड्रेझरिंग द्वारे नदीतील वाळू व गाळ किनारी टाकल्यास तेथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटेल तसेच तेथील समुद्र व नदी यांच्यातील जमिनीची रुंदी वाढून धोका निर्माण होण्याची संभावना कमी होईल. मच्छीमारी बरोबर पर्यटन हा व्यवसाय येथील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे तसेच ड्रेझरींग केल्यामुळे नदीच्या पाण्याची खोली वाढून कांदळवन प्रकल्प रोजगार निर्मिती योजना राबवता येईल. याबाबत लक्ष घालून या समस्येचे योग्य निराकरण करावे, अशी मागणी नरेंद्र मेस्त यांनी निवेदनात केली आहे.
