वीज समस्यांना आ नाईक जबाबदार

देवबाग, तारकर्ली, वायरी गावांत ९ वर्षात किती ट्रांसफार्मर दिले;भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांचा आरोप

⚡मालवण ता.१७-: देवबाग, तारकर्ली गावातील वीज समस्या आणि त्यासाठी सुरु असलेले ग्रामस्थांचे आंदोलन या सर्वाला आमदार वैभव नाईक जबाबदार आहेत. भाजपवर खोटे बोलण्याचा आरोप करणारे आम. वैभव नाईक यांनीच वीज प्रश्नाबाबत वेळोवेळी रेटून खोटे बोलत ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. ग्रामस्थांसमोर अधिकाऱ्यांना खोटे फोन लावून तिन्ही गावांसाठी आवश्यक विद्युत ट्रान्सफॉर्मर साठी जिल्हा नियोजन व सिंधुरत्न योजनेतून निधी देण्याची आश्वासने आम. नाईक यांनी दिली. मात्र प्रत्यक्षात जिल्हा नियोजन मध्ये ग्रामस्थाना आवश्यक ट्रान्सफॉर्मरची कोणतीही शिफारस आम. नाईक यांनी केलेली नसून केवळ हॉटेल व्यवसायिकांना उपयुक्त ठरणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची शिफारस केल्याचे समोर आले असून यामुळे आमदारांचा खोटेपणा उघड झाला आहे. मात्र, वीज प्रश्नाबाबत आता माजी खासदार निलेश राणे व भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले असून मालवण शहरासह किनारपट्टीवरील गावातील वीज समस्या सोडविण्यात येतील, असे भाजपचे व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मालवण येथील भाजपा कार्यालयात आज पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी विजय केनवडेकर यांनी वीज प्रश्नाबाबत भाजपची भूमिका मांडली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, आबा हडकर, के. पी. चव्हाण, महेश गांवकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, अवि सामंत, रवींद्र खानविलकर, हेमंत बांदेकर, वैभव सावंत, गणेश साळगावकर दत्ता चोपडेकर, अपर्णा धुरी, निलेश सामंत, राजू बिडये, ताता बिलये, जीजी गावडे यासह अन्य उपस्थित होते.

यावेळी श्री. केनवडेकर म्हणाले, देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून देवबाग गावातील विजेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी आम्ही ओरोस मध्ये जाऊन पालकमंत्र्यांचे ओएसडी श्री. साखरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधण्यात आला. देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ गावात ९ ट्रान्सफॉर्मर असून त्यांची क्षमता वाढवण्याची मागणी मागील चार वर्षांपासुन प्रलंबीत आहे. मागील आठ महिने भाजपची सत्ता आहे. यापूर्वी सत्तेत कोण होते ? गेली आठ वर्षे सत्तधारी आमदार राहिलेले आम. वैभव नाईक वीज समस्या का सोडवू शकले नाहीत. किनारपट्टी वरील ८ कोटी ८७ लाखांची महावितरणची कामे प्रलंबीत असतील तर हे आमदाराचे अपयश नाही का? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी आणण्यात ते अपयशी का ठरले? आमदार स्वतः जिल्हा नियोजनचे सदस्य असतात. मग निधीसाठी त्यांनी जिल्हा नियोजन कडे मागणी का केली नाही ? रत्नसिंधू योजनेतून ट्रान्सफॉर्मरसाठी निधी का उपलब्ध करून दिला नाही? मागील ९ वर्ष फक्त खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीने आमदारांचे काम सुरु आहे. केंद्र सरकारच्या दिनदयाळ योजनेत आमदारांनी मागणी केली असती तर हे सगळे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असते. तोक्ते वादळावेळी किनारपट्टी वरील सर्व विद्युत यंत्रणा सक्षम करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र त्याकडेही त्यानी दुर्लक्ष केले. आमदारकीच्या काळात वैभव नाईक यांनी केवळ तीन ट्रान्सफॉर्मर साठी शिफारसपत्रे दिली, त्यातील दोन शिफारस पत्रे खासगी हॉटेलच्या ट्रान्सफॉर्मर साठी होती. याचे पुरावे आमच्याकडे असून वेळ पडल्यास दूध का दूध, पानी का पानी करण्यास आम्ही तयार आहोत, असे विजय केनवडेकर म्हणाले.

जनता वीज समस्येबरोबरच इतर अनेक समस्यांनी ग्रासली असताना जनतेचे प्रश्न सोडवायला आमदार नाईक यांना वेळ नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी आवश्यक असलेली आमसभाही त्यांनी घेतलेली नाही. जनतेच्या प्रश्नाना सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने वैभव नाईक हे आमसभा लावण्यास टाळाटाळ करीत असून या नऊ वर्षात केवळ एकदाच त्यांनी आमसभा लावली अशी टिकाही विजय केनवडेकर यांनी केली. तर मालवण तालुक्यातील शिक्षकांच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी पं. स. च्या आवारात ठिय्या आंदोलनाची नौटंकी केली. मात्र एवढाच दम असेल तर ज्या विधी मंडळाचे तुम्ही सदस्य आहात, त्या विधिमंडळाच्या अधिवेशनात् जाऊन ही नौटंकी करा, असे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर म्हणाले.

You cannot copy content of this page