गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे नूतन चेअरमन अरुणराव डोंगळे यांचे प्रतिपादन
⚡कणकवली ता.१७-: जगभरातच दुधाची मागणी वाढत असून देशातील 140 कोटी लोकसंख्येसाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी दूध निर्मितीत वाढ करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार प्रति मानसी प्रतिदिन 300 ग्रॅम दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता आपल्या दूध आणि दुध उत्पादनांना खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी उठवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे नूतन चेअरमन अरुणराव डोंगळे यांनी केले.
कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय येथे कोकणातील दूध उत्पादक व संस्थाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी आयोजित केलेल्या सत्कारास उत्तर देताना श्री.डोंगळे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रमोद जठार होते.
कोकणातील तरुणांनी आपला गाव सोडून छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे न लागता आपल्या गावात राहून दूधव्यवसाय करावा व आपल्या कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनवावे गोकुळ दुध संघ शेतक-यांचे दूध बिल दर दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असल्यामुळे शेतक-याला खेळता व नियमित पैसा मिळतो शिवाय दिवाळीला बोनस देत आहे. कोकणात दूध व्यवसायासाठी काही गोष्टी प्रतिकूल असल्या तरी येथे असणारी मुबलक जागा हे दूध व्यवसायासाठी खूप जमेची बाजू आहे तसेच कोकणातील दमट वातावरणात गाई म्हशींचे वेतातील जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी लवकरच इस्त्राईल मधील तज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे.
साठ वर्षांपूर्वी गोकुळची सुरुवात दैनंदिन 700 लिटरने झाली होती आज गोकुळ दररोज 15 लाख लिटर दूध संकलन करत आहे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्याने येत्या 2 -3 वर्षांत एक लाख लिटर दूध निर्मितीचे ध्येय ठेवावे याकामी गोकुळ आपल्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहील आज कोल्हापूर जिल्ह्यात दूध बिला इतके पैसे अन्य कोणत्याही शेतीमालातून मिळत नाहीत खऱ्या अर्थाने गोकुळच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात समृद्धी आली आहे अशीच समृद्धी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावी असे यावेळी सांगितले.तसेच कोकणासाठी दोन रुपयांनी कमी झालेला गाय दुध दर लवकरच पुन्हा वाढवणे बाबत निर्णय घेऊ असे सांगितले.
यावेळी श्री.डोंगळे यांचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांच्या वतीने करण्यात आला तसेच जिल्ह्यात काही आदर्श काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,भागीरथ प्रतिष्ठानचे संस्थापक प्रसाद देवधर, कोकण विभागाचे संकलन अधिकारी अनिल शिखरे, डॉ.नितीन रेडकर,भगवान गावडे किल्लेदार ट्रेनिंग सेंटरचे सागर किल्लेदार, शाखाप्रमुख युवराज चौगुले,मार्केटिंग प्रमुख शिरीष खोपडे आदी कर्मचारी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
