वेंगुर्ले बंदर येथे जमिनीत गाडलेल्या चार ऐतिहासिक तोफा काढल्या बाहेर…
वेंगुर्ले: गेली कित्येक वर्षे वेंगुर्ला बंदर याठिकाणी जमिनीमध्ये गाडलेल्या स्थितीत असलेल्या ऐतिहासिक चार तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभागच्या दुर्गसेवक व रणरागिणींनी बाहेर काढून एक नवीन इतिहास रचला आहे.
वेंगुर्ला बंदर जेटीवर वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीत गाडल्या गेलेल्या या ऐतिहासिक तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेने पुर्नजीवन देऊन इतिहासाला पुन्हा उजाळा दिला आहे. या तोफा अर्ध्या जमिनीत गाडलेल्या स्थितीत चार वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. यातील एक तोफ ही एका हॉटेल च्या गडग्याला लागून होती. दुसऱ्या तोफेला लाईटचा खांब जोडलेला होता. तिसरी तोफ ही डिझेल च्या टॅंक च्या खाली होती तर चौथी तोफ अशीच पडून होती. तोफा काढण्याच्या २ दिवस व रात्री चाललेल्या या मोहिमेत सुमारे ४० दुर्गसेवकांसोबत सह्याद्रीच्या रणरागिणींनी सुद्धा मोलाचे योगदान दिले. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा, मुंबई, बेळगाव याठिकाणचे दुर्गसेवकांचा समावेश होता. या तोफा बाहेर काढल्यानंतर सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज कि जय ची घोषणा सर्वत्र ऐकू येत होती. सर्व दुर्गसेवकांनी भंडारा उधळण करत जल्लोष साजरा केला.
