वायरी ते तंत्रनिकेतन रस्त्याची डागडुजी न झाल्यास रस्ताच फोडून टाकू

वायरी भूतनाथ ग्रामस्थांचा संतप्त इशारा

⚡मालवण ता.०८-: वायरी भूतनाथ गावातील वायरी ते शासकीय तंत्रनिकेतन या रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली या रस्त्यावरून ये – जा करताना ग्रामस्थाना त्रास सहन करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसून या कामासाठी निधी मंजूर असूनही निविदा प्रक्रिया रखडवून ठेवण्यात आली आहे, असा आरोप वायरी भूतनाथ येथील ग्रामस्थांनी करत आता पावसाळ्यात या रस्त्यावरून वाहन चालविणे खडतर बनणार असल्याने तात्पुरती डागडुजी तरी करावी, अन्यथा ग्रामस्थ स्वतःहून हा रस्ता फोडून टाकतील, आमच्यावर गुन्हे दाखल केलात तरी बेहत्तर, असा आक्रमक इशारा जि. प. बांधकाम विभागाच्या मालवण उपअभियंत्यांना दिला.

वायरी भूतनाथ ते देवली या मार्गावरील वायरी ते तंत्रनिकेतन या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने याबाबत आज वायरी भूतनाथ ग्रामस्थांनी मालवणच्या जि. प. बांधकाम विभाग कार्यालयात धडक देऊन उपअभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगांवकर, संतोष लुडबे, मिलिंद झाड, बाबा मोरजकर, विकास मसुरकर, पांडुरंग मायनाक, ममता तळगावकर, मंदार लुडबे, अरुण तळगावकर, दादा वेंगुर्लेकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संतोष लुडबे, अरुण तळगावकर व इतरांनी वायरी ते शासकीय तंत्रनिकेतन या रस्त्याची दुर्दशा झाल्याबाबतची व्यथा मांडताना या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर असताना निविदा प्रक्रिया कां करण्यात येत नाही असा सवाल उपस्थित केला. यावर उपअभियंता चौगुले यांनी सदर निविदेस ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तांत्रिक अडचणीमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगितले. मात्र याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुर्दशा होणार असल्याने त्यासाठी खड्डे बुजविणे व तात्पुरती तात्पुरती डागडुजी होणे आवश्यक असून याबाबत तात्काळ कार्यवाही बांधकाम विभागाने करावी अशी मागणी लावून धरली. मात्र या डागडुजी साठी निधी उपलब्ध नसल्याचे उपअभियंता यांनी सांगितल्यावर ग्रामस्थांनी आक्रमक होत निधी नसेल तर अधिकाऱ्यांनी आपल्या खिशातील पैसे काढून रस्त्याची डागडुजी करावी, असे सुनावले.

पाऊस पडण्यापूर्वी येत्या दोन दिवसात रस्त्याची डागडुजी न झाल्यास आम्हीच हा रस्ता फोडून वाहतूक अडवून धरू, त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी आमच्यावर खुशाल गुन्हे दाखल करा, आम्हीही रस्त्याच्या दुरावस्थेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा आक्रमक इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावर रस्त्याची डागडुजी करण्याबाबत प्रयत्न करू, असे उपअभियंता यांनी सांगितले.

You cannot copy content of this page