सिंधुदूर्गला शिंदे-फडणवीस सरकारने काय दिले ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा सवाल

मालवण (प्रतिनिधी)

शासन आपल्या दारी अंतर्गत राज्यातील भाजप व शिंदे सरकार जनतेचे प्रश्न जाणून घ्यायला जिल्ह्यात येत आहे. मात्र जनतेसाठी काय केले हाच प्रश्न येथील जनता त्यांना विचारणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले असून ही स्थगिती उठणार का याच उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे. आनंद शिध्याच्या नावाखाली जनतेच्या मुखात तांदळाऐवजी कणी घालणाऱ्या या सरकारला येत्या काळात जनताच कणी सारखे बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण येथील शिवसेना शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, पंकज सादये, मनोज मोंडकर, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम करणारे शासन तोंडावर पडले आहे. ३४९ वर्षे झाल्याचे इतिहास संशोधनकांनी जाहीर केलेले आहे. तरीही शासनाने आपले छत्रपतींवर खूप प्रेम असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. असे असताना किल्ले सिंधुदुर्ग याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असताना त्याकडे शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही. किल्ल्याच्या दुरूस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात आलेला आहे. आघाडी शासनाने मंजूर केलेला निधीही थांबविण्यात आलेला आहे. यामुळे सध्याच्या शासनाचे छत्रपतींवरील प्रेम किती खरे आहे हेच दिसून येत आहे. मालवणसाठी मंजुर असलेल्या नळपाणी योजनांसाठीही मंजूर निधी शासनाने अडकवून ठेवलेला आहे, असा टोलाही श्री. खोबरेकर यांनी लागवला.

आज वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, जिवनावश्यक गोष्टी यांच्या दरात सतत होत असलेली वाढ यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे काही बोलणार का? शेतकऱ्यांना मदत दिली म्हणून सांगितली जाते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोहच होत नाही. येथील आंबा, काजू बागायतदारांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे दिसत नाही. सर्वसामान्यांवर दंडात्मक कारवाई होत असून धनिकांना अभय दिले जात आहे. आनंद शिधाच्या नावाखाली देण्यात आलेल्या धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे, असे आरोप श्री. खोबरेकर यांनी केले.

आज समुद्रात बेधुंदपणे एलईडी व पर्ससीन मासेमारी केली जात आहे. मच्छिमारी बंदी हंगाम सुरु होऊनही ही मासेमारी सुरूच आहे. त्याबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री मच्छीमारांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती ठोस भुमीका जाहीर करणार का ? असा सवाल श्री. खोबरेकर यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page