पुरग्रस्तांची नुकसान भरपाई तात्काळ द्या…

शिवसेना व वंचित कडून तहसीलदारांना निवेदन

बांदा/प्रतिनिधी
जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात बांदा व आसपासच्या गावातील ग्रामस्थांचे व दुकानदारांचे झालेले नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसून ती तात्काळ देण्यात यावी यासाठी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, उपतालुका प्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, सामाजिक कार्यकर्ते सुशील चौगुले, श्री ठाकूर श्री. बुगडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्यकारणी सदस्य गणपत चव्हाण, अमर धुरी, श्री.बांदेकर, गौरांग शेर्लेकर यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त दुकानदार, गाळेधारक, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी गेले दोन वर्षे बांदा भागातील ग्रामस्थ शेतकरी, बांदा शहरातील नुकसानग्रस्त दुकानदार, गाळेधारक, ज्यांना अद्यापी भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. भरपाई देण्यासंदर्भात शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. सदरील नुकसानग्रस्त विविध माध्यमातून आपल्यासह, वरिष्ठ पातळीवर निवेदने आंदोलने करत आहेत. त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली, मात्र नुकसान भरपाई अदा करण्याबाबत आपल्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडेपाटिल यांनी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होताच सर्वांच्या नुकसान भरपाई बाबत तत्काळ कार्यवाही होईल असे आश्वासन दिले. रुपेश राऊळ यांनी सदरील कार्यवाही बाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांना मंत्रालयात याबाबत लक्ष वेधण्यासाठी व खासदार विनायक राऊत यांनाही या बाबत लक्ष घालण्यासाठी आपल्या जवळ असलेली माहिती द्या असे सांगितल्यावर, सदरील माहिती देण्याचे मान्य केल्यामुळे येत्या काही दिवसात नुकसान ग्रस्तांना भरपाई मिळण्यास कार्यवाही होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page