जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे : मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा
⚡मालवण ता.१७-: ग्रंथालय ही दोन चाकी गाडी असून कर्मचारी व संस्था पदाधिकारी हे त्याचे महत्वाचे घटक आहेत. सध्याच्या काळात होणारे विविध नवीन बदल ग्रंथालयांनी स्वीकारून प्रवाहात येणे अपरिहार्य बनले आहे. वाचक आणि त्यांची आवड बदलत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी सामाजिक माध्यमांचा वापर करीत ग्रंथालयांचे उपक्रम जनतेपर्यंत पोहचविल्यास, नव्या सुविधा उपलब्ध केल्यास वाचक ग्रंथालयांकडे वळतील, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा संपन्न झाला. त्याचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, श्रीमंत खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे माजी ग्रंथपाल डॉ. जी. ए. बुवा, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रविंद्र कामत, राजन पांचाळ, अॅङ राजाराम गावडे, ग्रंथालय कर्मचारी मेळावा नियोजन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अनिल शिवडावकर, पुनम नाईक, कार्यवाह महेंद्र पटेल आदि उपस्थित होते.
प्रारंभी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक करत ग्रंथालय कर्मचाऱ्यांना एकत्र आणून त्यांना एकत्रित आनंद घेता यावा यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. जी. ए. बुवा म्हणाले, स्वातंत्र्य पूर्व काळापासून ग्रंथलयांनी समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. शासनाने गाव तिथे ग्रामपंचायत, शाळा, ग्रंथालय अशी घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणे राज्यातील ग्रामपंचायती भक्कमपणे उभ्या राहिल्या. पण गाव तिथे शाळा व ग्रंथालय यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा नारा लागत असताना तर दुसरीकडे मराठी शाळांचे भवितव्य अंधकारमय होताना दिसत आहेत. ग्रंथालये देखील मराठी माध्यमातून असल्याने गावांमधील ग्रंथालयांची परिस्थितीत गंभीर आहे. त्यामुळे ग्रंथालये अस्तित्व टिकवण्याची धडपड करीत आहेत. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयामध्ये पर्यटनविषयक सर्व माहिती उपलब्ध झाल्यास ग्रंथालये पर्यटन केंद्र म्हणून विकसित होतील, आज ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करून एक चांगला पायंडा पाडला आहे, असेही डॉ. बुवा म्हणाले.
यावेळी रविंद्र कामत म्हणाले, जर ग्रंथालयांना भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर त्यांना शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी ग्रंथालयांना स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे लागतील तरच ग्रंथालयाची स्थिती सुधारण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी ग्रंथालये हा शिक्षणाचाच एक भाग असल्याने शासनाला ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक निश्चीत धोरण ठरवावे लागेल, असे सांगितले. तर मंगेश मस्के यांनी स्नेहमेळावा हा मैत्रीपूर्ण उपक्रम असून सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी मित्र म्हणून एक राहूया, असे सांगितले. तर राजन पांचाळ यांनी ग्रंथालय संघाच्या वरिष्ठ व राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत कृतिशील कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे सांगितले.
यावेळी वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे योगदान हा परिसंवाद संपन्न झाला. त्यात कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथ संग्रहालया (जिल्हा ग्रंथालय) चे ग्रंथपाल राजन पांचाळ, रामेश्वर वाचन मंदिर, आचराचे ग्रंथपाल विनिता कांबळी, कोलगाव मुक्तद्वार वाचनालयाच्या ग्रंथपाल पूनम नाईक, सानेगुरुजी वाचन मंदिर, मालवणच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीचे ग्रंथपाल महेंद्र पटेल हे सहभागी झाले होते.
तसेच यावेळी ग्रंथालय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिलेल्या महात्मा गांधी वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल अनिल पंडित, माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाच्या माजी ग्रंथपाल श्रीमती मंगल सावंत, श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल दीनानाथ नाईक, एस. के. काझी काझीवाडा-आचराच्या वाचनालय, माजी ग्रंथपाल मनिकर्णिका हळदणकर, वासुदेवानंद सरस्वती वाचनालय, माणगावचे माजी ग्रंथपाल विजय केसरकर व श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस वेंगुर्लाचे माजी ग्रंथपाल जयवंत तुळसकर या निवृत्त ज्येष्ठ ग्रंथालय कर्मचाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सुत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले. महेंद्र पटेल यांनी आभार मानले.
