साठवणूक केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी भाजप आक्रमक;दोन दिवसात लावणार कचऱ्याची निरगत
देवगड-
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हददीमधील कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी कचरा डंपींग करीत असलेल्या जागी जावून आंदोलन छेडले. जोपर्यंत साठवुन ठेवलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भुमिकां भाजपाने घेतली. अखेर नगरपंचायत प्रशासनातर्फे दोन दिवसात कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू करीत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र आठ दिवसात डंपींग केलेल्या जागेतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्यावतीने देण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बालकर, उमेश कणेरकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर, भाजपा शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, व्ही. सी. वडपकर, मृणाली भडसाळे,उत्तम भडसाळे, चंद्रशेखर शेटटी आदी उपस्थित होते.
देवगड जामसंडे नगरपंचायतच्यावतीने अनिल ठाकूर यांच्या बागेत डंपींग केलेल्या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यात न आल्याने कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत असा आरोप करीत भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी प्रत्यक्ष कचरा साठवणूक केलेल्या ठाकूर यांच्या बागेत जावून आंदोलन छेडले.
देवगड जामसंडे न.पं.च्यावतीने तीन ठिकाणी कचरा डंपींग केला जात असून त्या कचऱ्याची कोणतीही योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही त्यामुळे साठवून ठेवलेला कचरा सर्वत्र पसरून कचरा व्यवस्थापनाचे अक्षरशः तीनतेरा वाजविले आहे ‘असा आरोप भाजपा गटनेते शरद ठुकरूल आणि माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी केला. जोपर्यंत कचऱ्याचे योग्य रित्या विल्हेवाट लावण्याबाबत न.पं.सत्ताधारी व प्रशासन आश्वासन देत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा भाजपा पदाधिकारी यांनी घेतला. यावेळी कच-याच्या ठिकाणी उभे राहून न.पं.सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित जागा मालकांनी केवळ सहा महिन्यासाठी जागा देण्याचा करार केला होता मात्र वर्षे उलटूनही त्या जागेतच कचरा टाकला जात आहे. डंपींग केलेल्या कचऱ्याची पुर्णत: विल्हेवाट लावून जागामालकांना त्यांची जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांनी केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी, रोहीत पाटील, अमोल चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा करून डंपींग केलेला कचरा उचलण्याबाबत दोन दिवसात कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिले. तसेच कचरा व्यवस्थापनाबाबत चारवेळा निवीदा काढण्यात ‘आली मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. ही निवीदाप्रक्रिया पुन्हा काढणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर भाजपाने सुरू केलेले आंदोलन स्थगित केले मात्र आठ दिवसात याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी दिली.
