गतवर्षीच्या तुलनेत उत्पादनातही वाढ, अपेक्षित दर मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधान
⚡बांदा ता.०९-: मडुऱ्यातील तिखट लाल मिरचीला गोवा राज्यातील पेडणे, म्हापसा, पणजी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरचीच्या उत्पादनात देखील वाढ झाली असून दरही चांगला मिळत आहे. मडुरा गावातून आठवड्याला दोन लहान टेम्पो मिरची म्हापसा बाजारपेठेत जात असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
पावसाळा जवळ येत असल्याने मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झाली आहे. मडुऱ्यातील गावठी चवदार मिरचीला गोवा बाजारपेठेत मोठी मागणी आहे. ही मिरची पातळ, चवीला उत्तम आणि पचनास चांगली असते. पेडणे, म्हापसा व पणजी बाजारपेठेत थेट मिरचीची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे मिरची उत्पादक शेतकरी प्रवीण उर्फ पिंट्या परब यांनी सांगितले.
पिंट्या परब म्हणाले की, मिरची पिकावर अनेक रोगांमुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण मिरचीचे भरघोस पिक घेतले. स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने आम्हाला म्हापसा किंवा पेडणे येथे मिरची विक्रीसाठी न्यावी लागते. त्या ठिकाणी आठवड्याला 80 किलो मिरची अपेक्षित दरात सहज विक्री होत असल्याने फायदा होतो. तसेच मडुऱ्यातील मिरचीला मोठी मागणीही असल्याचे पिंट्या परब यांनी सांगितले.
