वेंगुर्ला आडारी येथील घरफोडीचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडारी-टेंबवाडी येथील रहिवासी मनिषा गुंडराज शिरोडकर (वय ६४) यांच्या बंद असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे 31.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेऊन घरातील सामानाची तोडफोड करून साहित्य अस्ताव्यस्त टाकले होते. यामध्ये एकूण 15 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.याप्रकरणी शिरोडकर यांच्या तक्रारीनुसार वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनिषा शिरोडकर या कुटुंबासमवेत मुंबईला राहतात. शुक्रवारी दुपारी 3 वा. त्या पती गुंडराज व नातू पृथ्वीराज यांच्यासह वेंगुर्ला आडारी येथे आपल्या घरी आल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कापून बाजूला फेकल्याचे दिसून आले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता वॉशिंग मशीन, कुलर फोडलेला तसेच घरातील सोफासेट खोलून त्यातील सामान अस्ताव्यस्त केल्याचे आढळले. घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ वेंगुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची माहिती पोलिसांना दिली. शिरोडकर या दि. ४ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत वेंगुर्ला येथे आल्या होत्या. दि. १७ जुलै रोजी सायंकाळी त्या घराला कुलूप लावून मुंबई ला गेल्या.
चोरी झाली असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलिस हवालदार योगेश राऊळ, जयेश सरमळकर, महिला पोलीस हवालदार स्नेहा गवस, श्री. पालकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये
चोरट्यांनी घरात प्रवेश करून एक सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा मुहूर्तमणी, तीन सोन्याची चैन, सोन्याच्या आठ बांगड्या, सोन्याची दोन अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट, चांदीचा एक मध्यम आकाराचा मोदक, दोन पितळी समया असे सुमारे 31.5 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
विभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्याकडून माहिती घेतली. तसेच चोरीच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ठसे तज्ञ आणि डॉग स्कॉड कडून तपासणी करण्यात आली होती. दरम्यान वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी सर्वतोपरी तपासणी करून दाखल फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3), 331(4) हा गुन्हा दि. 17 जुलै 2026 रोजी 5.30 वा. ते दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी 3.30
वा. चे मुदतीत आडारी, टेंबवाडी ता. वेंगुर्ला येथे घडला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग तसेच वेंगुर्ला पोलिस ठाणे यांच्याकडून केलेल्या एकत्रित तपासात घटनास्थळी मिळून आलेल्या अंगुली मुद्रावरुण अंगुलीमुद्रा विश्लेषक सपोनि श्री. मागाडे यांनी अथक प्रयत्न करून उभादांडा आडारी येथील एक युवक असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा घरफोडीचा गुन्हा हा त्याचा साथीदार ( रा.उभादांडा आडारी ) याच्यासोबत केल्याचे कबूल केले आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यापैकी 11 तोळे सोने फिर्यादी यांच्या घरात मिळून आले. उर्वरित सोन्याच्या दागिन्यापैकी काही सोने हे सोनाराला विक्री केली असल्याचे त्यांनी तपासात सांगितले आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार -एक लोखंडी हातोडा व एक लोखंडी पारई हस्तगत करण्यात आली असून उर्वरित सोन्याचे दागिन्याबाबत त्यांच्याकडे पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक
मोहन दहिकर, जिल्हा
अप्पर पोलीस अधीक्षक
नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ ,एएसआय सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलिस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर, पोलीस हवालदार अमर कांडर तसेच वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, पोलिस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर, पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, आकाश घाटगे, पंकज पाटील यांच्या पथकाने केली आहे.
