प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा होणार सभा
*💫मालवण दि.२२-:* मालवण शहरातील पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत करण्याच्या प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी आज आयोजित केलेली नगरपालिकेची विशेष सभा तहकूब करण्यात आली. या प्रकल्पाचा डीपीआर सादर केलेल्या तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत आठ दिवसांनी पुन्हा सभा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. मालवण नगरपालिकेची विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, मंदार केणी, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, यतीन खोत, जगदिश गावकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, दर्शना कासवकर, शीला गिरकर, सेजल परब, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे आदी नगरसेवक उपस्थित होते. नगरपालिकेच्या सभेत शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत करणे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यात आला होता. या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्यासाठी नगरपालिकेने तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली होती. सुमारे ३२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक नव्याने बनविण्यात आले असल्याने याची सविस्तर माहिती सभागृहास देण्यात यावी अशी सर्व सदस्यांची मागणी होती. या संदर्भात संबंधित तांत्रिक सल्लागारास या बैठकीस प्रशासनाने का बोलविले नाही ? अशी विचारणा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी केली. सुधारित अंदाजपत्रकाची माहिती देण्यासाठी संबंधित तांत्रिक सल्लागारास आठ दिवसाची मुदत द्यावी. या काळात संबंधित तांत्रिक सल्लागार उपस्थित न राहिल्यास शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी असे श्री. आचरेकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आजची विशेष सभा आठ दिवसांसाठी तहकूब करण्यात आली. आठ दिवसांनी तांत्रिक सल्लागाराच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
