पतपेढीची निवडणूक जिंकण्यासाठी जोमाने प्रयत्न करा….

परमानंद वेंगुर्लेकर ; शिक्षक समिती विस्तृत कार्यकारिणीची सभा संपन्न.

*💫मालवण, दि.२२-:* शिक्षक समितीच्या सर्व सदस्यांनी आजपासून संघटनेसाठी वेळ देण्याबरोबरच संपर्क वाढवावा. शिक्षकांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घ्याव्यात. आक्रमकपणे समितीची भूमिका, केलेली कामे शिक्षकांपर्यंत पोहोचवा व अहोरात्र मेहनत घेऊन पतपेढीची निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले. शिक्षक समितीच्या तालुक्याच्या विस्तृत कार्यकारिणीची सभा कट्टा येथील मामा माड्ये हॉल येथे पार पडली. सभेस जिल्हाध्यक्ष नितीन कदम, शिक्षक समितीचे नेते व ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, जिल्हा सचिव सचिन मदने, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य पदाधिकारी सुगंध तांबे, जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष दादा जांभवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, तालुका सचिव नवनाथ भोळे, तालुका पतपेढीचे संचालक श्री. गाड तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व समितीचे निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. भोळे यांनी स्वागत केले. राज्य समन्वयक र. ग .कर्णिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तालुकाध्यक्ष वेंगुर्लेकर यांनी मागील वर्षभराचा कार्य अहवाल सादर केला. श्री. मालंडकर यांनी चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, आदर्श शिक्षक पुरस्कार, NPS योजनेविषयी परिपूर्ण मार्गदर्शन मिळावे, गेल्यावर्षी झालेल्या विनंती बदल्या याविषयी आपली भूमिका मांडली. तसेच पतपेढीच्या निवडणुकीसाठी तयार राहणे, व्यूहरचना आखणे, संपर्क वाढवण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र दर्शन बिले, त्यासाठी झालेला खर्च याबाबत माहिती दिली. तसेच नवीन टप्पा सुरु झाला असून सर्वानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. भोळे यांनी केले. डिसीपीएसचे हिशोब तक्ते चुकीचे मिळालेले आहेत. तरी त्यासंदर्भात लेखा वित्त अधिकाऱ्यांची भेट घेत वस्तुनिष्ठ माहिती घेण्याचे ठरले. ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. चव्हाण यांनी संघटना वाढविणे, मजबूत करणे, संपर्क वाढवणे याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष श्री .कदम यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार का जाहीर झाले नाहीत ? आंतर जिल्हा, जिल्हाअंतर्गत बदल्या, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. आंबोकर यांच्या बदली अगर सक्तीच्या रजेवर पाठवणे याबाबत जिल्हा समिती करत असलेल्या प्रयत्नांचा तपशील मांडला. जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष श्री. जांभवडेकर यांनी पतपेढीच्या योजनांची माहिती दिली. श्री. कोरगावकर यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. श्री. मदने यांनी कार्याचा अहवाल सादर केला. संघटनात्मक कार्याची वर्क शीट देखील तयार केली आहे. त्यासाठी तालुका कार्यकारिणीच्यावतीने मदने यांचे अभिनंदन करण्यात आले. विस्तृत कार्यकारिणी सभा जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांच्यात संवाद साधणारी – समन्वय साधणारी ठरली. यापुढेही अशाच सभेचे आयोजन वर्षातून दोन ते तीन वेळा व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सुयोग धामापूरकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page