बांदा येथील घटना; गुन्हा दाखल
बांदा/प्रतिनिधी
इन्सुली-सावंतटेंब येथील प्रथमेश राणे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने अडीच तोळ्याचा हार लंपास केला. सदरची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. भरवस्तीत असलेल्या घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इन्सुली सावंतटेब येथील प्रथमेश राणे यांचे वडील श्रीकांत व बायको आरती हे आपल्या आरोंदा येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घराला कुलूप केले होते. दरम्यान रात्री उशिरा घरात आले असता दरवाज्याचे कुलूप दिसून आले नाही तसेच मुख्य दरवाज्याला आतून कडी घातली होती. तसेच मागील दरवाजा पहिला असता त्याला बाहेरून कडी घातली होती ती कडी उघडून पाहिले असता कपाटाचा दरवाजा उघडा दिसला पाहणी केली असता त्यात बायकोचा २५ ग्रामचा सोन्याचा हार दिसून आला नाही. याबाबतची माहिती प्रथमेश राणे यांनी बांदा पोलीसात दिली असून यात ८० हजार किमतीचा हार लंपास केल्याचे नमूद केले आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.
