२७ ते ३० एप्रिल दरम्यान होणार महोत्सव
मालवण (प्रतिनिधी)
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रथमच होणाऱ्या गाबीत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हा महोत्सव भव्य दिव्य करण्यासाठी गाबीत समाज बांधव सज्ज झाले आहेत. दि. २७ रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण शहरातून भव्य मोटारसायकल रॅली तसेच मोरयाचा धोंडा ते दांडेश्वर मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढून या महोत्सवास प्रारंभ होणार आहे. या चार दिवसीय महोत्सवात सागरी सुंदरी स्पर्धा, शेंडी पागणे मासेमारी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नौकनयन व जलतरण स्पर्धा, गाबीत भूषण पुरस्कार वितरण, व्याख्याने व परिसंवाद, नृत्याविष्कार, ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
गाबीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २७ एप्रिल रोजी गाबीत बांधव आपला मच्छिमारी व्यवसाय व वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद ठेवून या महोत्सवाच्या शुभारंभात सहभागी होणार आहेत. २७ रोजी सकाळी १० वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा, होणार आहे. तर सायंकाळी ५ वा. देऊळवाडा येथून मोटारसायकल रॅली निघणार असून त्यानंतर ५.३० वाजता मोरयाचा धोंडा येथून श्री देव दांडेश्वरपर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाजांच्या भुमिकेतील कलाकार आणि मावळे असा ऐतिहासिक सोहळा साकारला जाणार आहे. याच वेळी समुद्रातून सजावट केलेल्या आणि मशाली व झेंडे लावलेल्या नौकांची मिरवणूकही निघणार आहे. सायंकाळी ६ वा. दांडी येथे महोत्सवाच्या ठिकाणी गाबीत महाज्योतीचे प्रज्वलन व गाबीत महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. ६.३० वा. गाबीत भूषण पुरस्कार प्रदान सोहळा व गाबीत सन्मान सत्कार कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा व होडी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण होणार आहे. रात्री ८ वा. इतिहास संशोधक अमर आडके यांचे गाबीत समाज व शिवकाल संबधी भाषण, रात्री ९ वा. गाबीत समाजाचा शिमगोत्सव सदर होणार आहे. दि. २८ रोजी सकाळी ८.३० वा. दांडी किनारी रापण प्रात्यक्षिक दाखविणे, शेंडी पागून मासे पकडणे स्पर्धा, गरवून मासे पकडणे प्रात्यक्षिक होणार आहे. तर सकाळी १० वा.मामा वरेरकर नाट्यगृह येथे मत्स्य संपदा व सिंधुरत्न योजना, किमान कौशल्य विकास व रोजगार योजना, मत्स्य उद्योग, बँक कर्ज प्रकरणे याबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. तर दांडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गाबीत समाजाचे जिल्हास्तरीय कार्यक्रम, सागरी सुंदरी स्पर्धा, गाबीत भूषण पुरस्कार व सन्मान प्रदान कार्यक्रम होणार आहे. दि. २९ रोजी सकाळी १० वा. मामा वारेरकर नाट्यगृह येथे पर्यटन, जलक्रीडा, जात पडताळणी, बँक योजना याविषयी मार्गदर्शन तर १२ वा. “मच्छीमार समाज व मानव साधन विकास” या विषयावर प्रा.नंदकिशोर परब यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत दांडी येथे स्थानिक कलाकारांचे गुणदर्शनपर कार्यक्रम, शेंडी पागणे मासेमारी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण, गाबीत भूषण पुरस्कार वितरण व सन्मान, रात्री ९ वा. मुंबईतील सुप्रसिद्ध कलाकारांचा नृत्याविष्कार कार्यक्रम होणार आहे.
दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. दांडी किनारी नौकनयन व जलतरण स्पर्धा, सकाळी १० वा. गाबीत समाजातील वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, उच्च शिक्षित आणि उद्योजक यांचा परिसंवाद, दुपारी १२ ते ३ वा. गाबीत महिलांसाठी पाककला स्पर्धा व प्रात्यक्षिके, सायं. ५ ते रात्री ८ वा. दांडी येथे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, गाबीत भूषण सन्मान, जलतरण, पाककला स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री ९ वा. मुंबईतील सुप्रसिद्ध नृत्यांगना, सेलिब्रेटी यांचा ऑर्केस्ट्रा सदर होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे. तरी गाबीत समाज बांधव भगिनींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, सिंधुदुर्गा जिल्हा गाबीत समाजचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.
