७ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी : येथील सेंट्रल उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकांच्या कक्षात बेकायदेशीरपणे घुसून शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच संस्थेचे नुकसान केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी घडली अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी इकबाल दस्तगीर मुलानी (वय ५१, रा. दीप रेसिडेन्सी, सालईवाडा, सावंतवाडी) हे सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक कक्षात आपले कामकाज करत असताना आरोपींनी कोणतीही पूर्वकल्पना न देता कक्षात जबरदस्तीने प्रवेश केला. तुम्हाला आम्ही निलंबित केलेले आहे, तुला येथे नोकरी करू देणार नाही, असे म्हणून त्यांनी फिर्यादींशी शिवीगाळ केली.
तसेच कक्षातील बोर्ड काढत असताना तेथे उपस्थित असलेल्या सावंतवाडी जमात बॉम्बेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे न ऐकता निलोफर बेग यांचा हात झटकून त्यांना ढकलून दिले आणि बोर्ड काढून नुकसान केली. यानुसार रफीद्दीन मुतालिक शेख (वय ६५, रा. मुंबई), अश्फाक युसुफ शेख (वय ५४, रा. मुंबई), इफ्तिकार शाहिद शेख (वय ४५, रा. मुंबई), इफ्तिकार इम्तियाज राजगुरू (वय ४०, रा. सावंतवाडी), सलमान फारूक नाईक (वय ३५, रा. सावंतवाडी), जरीना मुबारक खान (वय ६५, रा. सावंतवाडी), निषाद ईर्शान बुराण (वय ३५, रा. सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी इकबाल मुलानी यांच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार शिंदे व गवस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी करत आहेत.
