*💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* अभिलेखात जमीन अधिकाराबाबची नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कसाल मंडळ अधिकारी संदीप हांगे याला सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. संशयित आरोपीच्या वतीने वकील संग्राम देसाई, वकील अविनाश परब, वकील सुहास साटम, वकील अशपाक शेख यांनी काम पाहिले. ओरोस येथील पद्मनाभ परब यांनी अणाव येथील श्री पालव यांच्या मालकीची जमीन विक्रीत घेतली आहे. या विक्री बाबतचे खरेदी खतही करण्यात आले आहे. त्यानुसार तलाठी कार्यालयातील अभिलेखात जमिनीच्या मालकी हक्काबाबत अधिकाराची नोंद करण्यात साठीचा अर्ज पद्मनाभ परब यांनी अणाव तलाठी यांच्याकडे दिला होता. त्यानंतर तो पुढील मंजुरीसाठी मंडळ अधिकारी संदीप हांगें यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र या अभिलेखात नोंद करण्यासाठी हांगे यांनी पद्मनाभ परब यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर चार हजार रुपयांवर तडजोड झाली होती. परब यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी 16 फेब्रुवारी रोजी हांगे याला कसाल मंडळ अधिकारी कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. बुधवार दिनांक 17 रोजी जिल्हा विशेष न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान 20 रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
लाच घेतल्याप्रकरणी कसाल मंडळ अधिकाऱ्यास न्यायालयीन कोठडी
