कल्पवृक्ष शेतकरी गट, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व हेडगेवार प्रकल्प माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
*💫सावंतवाडी दि.२०-:* कल्पवृक्ष शेतकरी गट मळगाव, भगीरथ प्रतिष्ठान झाराप व हेडगेवार प्रकल्प माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव-ब्राह्मणआळी येथे दुध व्यावसायिक शेतकरी प्रशिक्षण पार पडले. यावेळी सिंधुदुर्ग पर्यायाने मळगावातील पहिल्या सायलेज मशीनचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. प्रशिक्षणाचा मळगावातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, हेडगेवार प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवेकर, व्यवस्थापक एकनाथ सावंत, धनंजय गोळम, कल्पवृक्ष शेतकरी गटाचे अध्यक्ष संतोष सामंत, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, रामकृष्ण पंतवालावलकर, महेश पंतवालावलकर, कल्पवृक्ष शेतकरी गटाचे सर्व सदस्य व मळगावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी शेतकऱ्यांना सायलेज मशीनबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सायलेज मशीन ही सिंधुदुर्गातील व मळगाव येथील पहिलीच मशीन आहे. सायलेज मशीन दुध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने व जनावरांना हेल्दी ठेवण्याच्या दृष्टीने फार उपयोगी आहे. मका किंवा तत्सम घास, गवत या मशीनमध्ये आपण सायलेज करू शकतो. सायलेज केलेल्या खाद्यामुळे दुधाचा फॅट वाढून दुधाचा दर वाढतो. दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. शेतीचे अर्थकारण बदलायचे असेल तर दुध धंदा उपयुक्त आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. देवधर यांनी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार रामकृष्ण पंतवालावलकर यांनी मानले. या प्रशिक्षणाला मळगावातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
