बांदा, मडुरा दशक्रोशीतील मिरची, चवळी, नाचणीचे उत्पन्न घटणार ; दुबार संकटाने शेतकरी चिंताग्रस्त
*💫बांदा दि.२०-:* शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसात मडुरा व बांदा दाढाक्रोशीतील नगदी पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची बसलेली झळ अजूनही कायम असताना अवकाळी पावसाचे दुसरे संकट ओढावल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. बांदा, मडुरा दशक्रोशीला शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे शेतकर्यांची धांदल उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजूचे उत्पन्न घटणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर मिरची, चवळी ही नगदी पिकेही धोक्यात आली आहेत. ऐन काजू हंगामातच गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. शेर्ले नदी भागात मोठ्या प्रमाणावर चवळी, नाचणी, भुईमुग, मिरची, मका, कुळीथ आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. तसेच मडुरा दशक्रोशीत गव्यांचा हैदोस चालू असताना शेतकऱ्यांनी नगदी पिकाचे उत्पन्न घेऊन धाडस दाखविले होते. बुजगावण्याच्या आधार घेऊन पिकांचे संरक्षण केले जात असताना शुक्रवारी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीत शेतकऱ्यांना नुकसानीची बसलेली झळ भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या दमाने शेतकरी उभा झाला होता. काढणीयोग्य आलेल्या आंबा व काजू पिकांवर काळे डाग पडल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेत दर विक्रीवर होणार आहे. कमी दरात काजू, आंबा विकला गेल्यास केलेला खर्चही हाती मिळणार नसल्याची चिंता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
