बांदा/सकाळ वृत्तसेवा
भारतीय संविधानाने घालून दिलेल्या आदर्शांनुसार वैद्यकीय क्षेत्रातून जनसेवा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नावीन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल (कै.) डॉ. द. भि. खानोलकर यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने मरणोत्तर ‘ग्रामरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधी चौक, बांदा येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. डॉ. खानोलकर यांचे नातू डॉ. मिलिंद खानोलकर यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
यावेळी बांदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रत्नाकर आगलावे, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, बाळु सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, रिया येडवे, श्रेया केसरकर, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी पटेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, व्यापारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
याच कार्यक्रमात बांदा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत बांदा केंद्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या दुर्वा वारंग हिने ९७.२० टक्के गुण मिळविले. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या निखिल देसाई याने ९४.८० टक्के, तर दिव्य ज्योती स्कूलच्या स्वरा सातर्डेकर हिने ९४.२० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
बारावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालय, बांदा येथील गांधाली धुरी हिने वाणिज्य शाखेत ८५ टक्के, सोनाली हरमलकर हिने अकाउंट्स अँड ऑफिस मॅनेजमेंटमध्ये ८४.८३ टक्के, तर विघ्नेश मळगावकर याने इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये ८३.६७ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कै. डॉ. खानोलकर यांच्या सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण ठेवत ग्रामपंचायतीने दिलेला मरणोत्तर ग्रामरत्न पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
फोटो:-
बांदा गांधीचौक येथे मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात डॉ मिलिंद खानोलकर यांनी सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते ग्रामरत्न पुरस्कार स्वीकारला. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
कै. डॉ. द. भि. खानोलकर यांना मरणोत्तर ग्रामरत्न पुरस्कार
