बांदा ता.१६-:
बांदा परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांदा-बोरीवली ही मध्यंतरी बंद असलेली थेट एसटी बससेवा १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडीचे गटनेते तथा इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या बसफेरीचे बांदा स्थानकात स्वागत करण्यात आले.
बांदा हे गोवा सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक व वाहतूक केंद्र असून, परिसरातील इन्सुली, वाफोली, कास, निगुडे, शेर्ले, डिंगणे, गाळेल, दोडामार्ग आदी गावांतील नागरिकांचा बांदा शहराशी नियमित संपर्क असतो. या परिसरातील मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई, बोरिवली, ठाणे व उपनगरांत वास्तव्यास आहेत. त्यामुळे थेट एसटी सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती.
बांदा-बोरिवली बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना सावंतवाडी, कुडाळ किंवा कणकवली येथे जाऊन मुंबईकडे जाणारी बस पकडावी लागत होती. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण तसेच सणासुदीच्या काळात गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी कणकवली आगार व्यवस्थापक निवास कदम यांच्याकडे निवेदन देऊन बांदा-बोरीवली बससेवा पूर्ववत करण्याची तसेच बांदा-ठाणे थेट बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यासोबतच राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडेही ई-मेलद्वारे पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून १३ ऑगस्टपासून थेट बससेवा सुरू झाली आहे.
या बससेवेमुळे बांदा व परिसरातील हजारो नागरिकांना मुंबई, बोरिवली आणि ठाणे परिसरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय व अन्य कामांसाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने चाकरमान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
बससेवा सुरू झाल्याबद्दल नितीन राऊळ यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बसचे चालक वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुंबई येथे रवाना होणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कासचे सरपंच प्रवीण पंडित, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, राम पालव, सखाराम पंडित, अहिल्या पंडित तसेच बसचालक नितू राणे उपस्थित होते.
पाठपुराव्याला यश; बांदा-बोरीवली-ठाणे एसटी सेवा सुरू
