नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांचा टोला..
⚡मालवण ता.१६-:
मालवण नगरपरिषदेच्या कारभारावर ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या टीकेला शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी प्रत्युत्तर देत माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागील कार्यकाळातील प्रलंबित कामांचा पाढा वाचला आहे. ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांनी वैभव नाईक यांच्या अपयशाचा फॅक्टर झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, कुडाळ-मालवणच्या जनतेनेच वैभव नाईक यांना निवडणुकीत पराभूत केले असून, त्यांच्या कार्यकाळातील अपूर्ण व रखडलेल्या कामांचा उल्लेख होतच राहणार असल्याने वैभव नाईकांच्या अपयशाचा पाढा आमच्या बरोबर जनता कायमच वाचणार असल्याचा सणसणीत टोला मालवणच्या शिवसेना नगरसेविका भाग्यश्री मयेकर यांनी लगावला आहे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाग्यश्री मयेकर यांनी म्हटले आहे की, मालवण नगरपरिषदेत सत्तेत आल्यानंतर केवळ आठ महिन्यांत विद्यमान सत्ताधाऱ्यांना अपयशी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या काळातील प्रलंबित कामांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्याचे खापर विद्यमान सत्ताधाऱ्यांवर फोडणे योग्य नाही,
माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात मालवण शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडली किंवा पूर्णत्वास गेली नाहीत, असा आरोप करत मयेकर यांनी मत्स्यालयासाठी प्रस्तावित निधी परत का गेला, भुयारी गटार योजना अद्याप पूर्ण का झाली नाही, सफाई कामगार संकुलाचे काम का रखडले, भाजी मार्केट अद्याप पूर्ण का झाले नाही आणि प्रस्तावित नळपाणी योजनेला मंजुरी मिळण्यासाठी सहा वर्षे का लागली, असे सवाल उपस्थित केले.
त्या पुढे म्हणतात “जर मागील अकरा वर्षांत माजी आमदारांनी मतदारसंघात उल्लेखनीय काम केले असते, तर जनतेने त्यांना माजी केले नसते, कुडाळ- मालवणच्या जनतेनेच वैभव नाईक यांना निवडणुकीत पराभूत केले असून, त्यांच्या कार्यकाळातील अपूर्ण व रखडलेल्या कामांचा उल्लेख होतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .
ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष राधिका मोंडकर यांच्यावरही टीका करताना मयेकर यांनी म्हटले आहे की, राजकारणात नुकतेच आलेल्या व्यक्तींनी वस्तुस्थितीची शहानिशा करूनच भूमिका मांडावी. एका बाजूला नगरपरिषदेच्या स्वच्छतेवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान नगरसेवकांसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन फोटोसेशन करायचे, ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करीत त्यांनी म्हटले आहे की, ए आय व्हिडिओच्या माध्यमातून माजी आमदारांच्या अपयशी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे राजकारणात जनतेचे मूल्यमापन महत्त्वाचे असते. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे राजकारण थांबवावे,” असे त्या म्हणाल्या.
उपोषण करायचे असेल तर माजी आमदारांच्या घराबाहेर करा
मालवण नगरपरिषदेतील प्रलंबित प्रश्नांवर उपोषण करण्याची इच्छा असेल तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या घराबाहेर उपोषण करून त्यांच्या कार्यकाळातील रखडलेल्या कामांचा जाब विचारावा, असे आव्हानही भाग्यश्री मयेकर यांनी दिले. त्यावेळी जनताही मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रश्न विचारेल, असा दावा त्यांनी केला.
आमदार निलेश राणे विकासासाठी कटिबद्ध
मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आमदार निलेश राणे कटिबद्ध असून, विकासासाठी दूरदृष्टीसोबत निधी खेचून आणण्याची धमक आवश्यक असते आणि ती आमदार निलेश राणे यांच्यात असल्याचे नमूद करून मयेकर यांनी आमदार निलेश राणे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणत मालवण शहराच्या विकासाला गती देण्यास सुरुवात केली आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू असल्याचेही भाग्यश्री मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.
