सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान..
⚡सावंतवाडी ता.१६-: कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांचा कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरव करण्यात आला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आदरणीय श्री. भूषण गवई यांच्या हस्ते अॅड. नाईक यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर येथे रविवारी (दि. १६ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या या वर्धापनदिन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. रवींद्र घुगे, न्यायमूर्ती कर्णिक, न्यायमूर्ती कोलाबावाला, न्यायमूर्ती कुलकर्णी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूर सर्किट बेंचमधील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती उपस्थित होते.
तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य, सर्किट बेंच कृती समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र मंडलिक, सहा जिल्हा वकील संघटनांचे अध्यक्ष, न्यायाधीश तसेच वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या सोहळ्यास भारताचे एडिशनल सॉलिसिटर जनरल श्री. अनिल सिंग, महाराष्ट्र राज्याचे अॅडव्होकेट जनरल श्री. साठे, अॅड. संग्राम देसाई व त्यांचे सहकारी यांचीही उपस्थिती होती.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी विविध स्तरांवर झालेल्या प्रयत्नांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने दिलेल्या योगदानाची दखल घेत अॅड. परिमल नाईक यांचा करण्यात आलेला हा गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील वर्गासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
