*अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांचे प्रतिपादन
मालवण : राज्य शासनाने थोरपुरुषांच्या यादीत आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा समावेश केला. सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय काढल्याने महाराष्ट्रभर साजरी करण्यात येणारी जयंती हा बाळशास्त्रींच्या कार्याचा गौरव आहे, असे कौतुकोद्गार काढत जांभेकर यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यात साकारत असलेले प्रशस्त पत्रकार भवनही राज्यातील पत्रकारांसाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांनी काढले. मालवण तहसील कार्यालयात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची २०९ वी जयंती साजरी करण्यात आली. जांभेकर यांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार जी. एम. कोकरे आणि मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आनंद मालवणकर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, उपाध्यक्ष अमित खोत, सचिव प्रशांत हिंदळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य विद्याधर केनवडेकर, पी. के. चौकेकर, कुणाल मांजरेकर, महेश कदम, महेंद्र पराडकर, सिद्धेश आचरेकर, संग्राम कासले, आप्पा मालंडकर, समीर म्हाडगूत, भूषण मेतर, ओंकार यादव आदी उपस्थित होते. यावेळी मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रज राजवटीत त्यांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने थोर पुरुषांमध्ये त्यांचा केलेला समावेश पत्रकारांसाठी गौरवास्पद क्षण असल्याचे सांगितले यावेळी पी. के. चौकेकर यांनीही जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाचे निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार आनंद मालवणकर, तर आभार अमित खोत यांनी मानले. फोटो : मालवण तहसील कार्यालयात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची शासकीय जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार आनंद मालवणकर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, उपाध्यक्ष अमित खोत, सचिव प्रशांत हिंदळेकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य विद्याधर केनवडेकर, पी. के. चौकेकर, कुणाल मांजरेकर, महेश कदम, महेंद्र पराडकर, सिद्धेश आचरेकर,व इतर (छाया : समीर म्हाडगूत)
