मालवणात लवकरच धनगर समाजाचा मेळावा – प्रवीण काकडे

⚡मालवण ता.०८-: धनगर समाजाने देशाला अनेक महापुरुष दिले मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी आज धनगर वाड्यांपर्यंत सेवा सुविधा पोहचलेल्या नाहीत. धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे म्हणून आम्ही अनेक वर्षे लढा देत आहोत. कोकण विभागात धनगर समाज बांधवाना एकत्र आणून संघटना मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न असून या दृष्टीने मालवणात लवकरच धनगर समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली

मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऑल इंडिया धनगर समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे हे बोलत होते. यावेळी देवली ग्रा. पं. सदस्य नवनाथ झोरे, प्रदीप शिंदे, शंकर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पहिले ग्रा. पं. सदस्य म्हणून नवनाथ भोळे यांचा प्रवीण काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रवीण काकडे म्हणाले, मालवण तालुक्यात धनगर समाजाचा पहिलाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून देवली ग्रामपंचायतचे सदस्य नवनाथ भोळे हे निवडून आले, याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढे आमच्या समाजाचा बांधव निवडणुकांना सामोरा जाऊन आमच्या समाजाचे प्रतिनिधी कसे करेल याकडे आमचे प्रयत्न राहतील असे सांगून ते म्हणाले आज धनगर समाजाच्या वाड्यांमध्ये अनेक समस्या आहेत. अपेक्षे प्रमाणे सुविधा नाहीत. काही वाड्यांमध्ये पाणी, वीज, रस्ते पोहचलेले नाही. शिक्षणाचाही अभाव दिसून येतो. यासाठी आम्ही सातत्याने शासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा करत आहोत. कोकणात डोंगरी भागात धनगर समाजाचे वास्तव्य आहे. तेथेही पाण्याच्या समस्या आहेत, यासाठी उपाययोजना करावी लागेल, असेही प्रवीण काकडे म्हणाले.

धनगर समाज एकसंध दिसून येत नाही. म्हणून धनगर समाजातील बांधवाना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धनगर समाजातील कार्यकर्ते कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहेत, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. समाजासाठी काम करणे हेच आमचे ध्येय आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. आपल्या न्याय हक्कासाठी धनगर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी मालवणात लवकरच धनगर समाज मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. असेही प्रवीण काकडे म्हणाले.

You cannot copy content of this page