दोन दिवसांत शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन
मालवण दि प्रतिनिधी
गेले दोन दिवस धामापूर नळपाणी योजनेतून मालवण वासियांना होणारा माती – चिखलयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले यासंदर्भात आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मालवण नगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणा केली असता येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असून ज्या व्यक्तीमुळे नळपाणी योजनेची पाईपलाईन फुटली गेली आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू अथवा त्याच्यावर फोजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान, मालवणातील नागरिकांनी धामापूर नळपाणी योजनेचे पाणी उकळून आणि गाळून प्यावे असे आवाहन मालवण नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून मालवणात धामापूर नळपाणी योजनेतून चिखल आणि मातीयुक्त पाणी येऊ लागल्याने मालवणातील नळपाणी योजनाधारक त्रस्त बनले. मालवणात धामापूर नळपाणी योजनेचे जवळपास दीड हजार कनेक्शन आहेत बहुतांश नागरिकांकडे विहिरी नसल्यामुळे ते या नळपाणी योजनेच्या पाण्याचा वापर करतात. गेले दोन दिवस चिखल आणि मातीयुक्त पाणी येऊ लागल्याने संबंधित नागरिक हैराण झाले. मालवण हे पर्यटन शहर असल्याने नळपाणी योजनेचे पाणी खराब येऊ लागल्याने नागरिकांबरोबर पर्यटन व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली त्यातच शहरालगतच्या एका व्यक्ती बोअरवेल खोदत असताना त्याच्याकडून पाईपलाईन फुटल्याची चर्चा सुरु झाल्याने नागरिकांनी नगरपालिकेकडे धाव घेतली. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसने मालवण नगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे आज शनिवार असल्याने कार्यालय बंद असतानाही काही अधिकारी कामानिमित्ताने कार्यलयात उपस्थित होते. त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती कथन केली व पाईपलाईन फोडणाऱ्या त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले
यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, अरविंद मोडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, शहर चिटणीस श्रेयस माणगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, देवानंद लुडबे, किशोर नाचणोलकर, संदीप परब, पराग माणगावकर, मेघः श्याम लुडबे, उपाध्यक्ष हेमंत माळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, लुईस मेंडीस, मधुकर लुडबे, योगेश्वर कुर्ले, आप्पा चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, समीर आगणे आदी उपस्थित होते.
दरम्यान, नागरिकांनी नळपाणी पुरवठा योजनेतून येणारे पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
