भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची टीका
मालवण (प्रतिनिधी)
शिंदे व भाजप यांचे सरकार आल्यावर विकास कामांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. आज जिल्ह्यात सुमारे ३०० कोटींचा निधी या सरकारने दिला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी कवडीही आणली नाही. उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गसाठी केवळ शब्द आणि टीका पाठवली, निधी नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, संतोष साटविलकर, महेश मांजरेकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, आशिष हडकर, दादा नाईक, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालेकर यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील परिस्थिती आम्ही पाहून होतो. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे येथे दौरा करून गेले. मात्र जिल्ह्यासाठी कवडीही देऊ शकले नाही. येथील आमदार, खासदारही फेल गेले. सरकारकडे निधी मागण्यात आणि सरकारने त्यांची दखल घेण्यात ते कमी पडले. मात्र, आमचे सरकार आले आणि कुडाळ, मालवणात गेल्या साडेआठ वर्षात जेवढे पैसे आले नाहीत त्यापेक्षा कितीतरी पट अधिक कोट्यावधींचा विकासनिधी गावागावात आला आहे. जिल्ह्यात ३०० कोटी विकासनिधी आला आहे. आम्ही मागणी केलेली सर्व विकासकामे शासन मंजूर करत आहे. यापेक्षाही विकासनिधी येणार आहे. कोकणवर प्रेम ठेवून मागेल तो निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिला. आम्ही सर्वजण सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार माध्यमातून गावागावात करोडोचा विकासनिधी मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकणावर प्रेम ठेवून आम्ही मागू तो निधी देत आहेत, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
