⚡मालवण ता.१३-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात विकासगंगा आणली असे म्हणणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्री राणे यांनी मालवणसाठी किती निधी आणला ? आजपर्यंत आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या विकासकामांसाठी जो स्व: निधी दिला तेव्हढा निधीही श्री राणे हे आणू शकले नाहीत अशी जळजळीत टीका शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करून कोणतीही विकासकामे मंजूर व्हायला वर्षभर आधी त्याचे आराखडे तयार करून शासनाला सादर करावे लागतात, अर्थसंकल्पात मालवण मधील कामांसाठी मंजूर झालेला निधी हा आमदार नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यातूनच मंजूर झाला आहे, याबाबत त्या त्या शासकीय विभागांनी दिलेली पत्रे आमच्याकडे आहेत, बंधाऱ्यांच्या कामांसाठी नारायण राणे व निलेश राणे यांनी निधी देण्याचे केवळ लोकांना आश्वासन देऊन त्यांच्या सोबत ४२० चा प्रकार केला आहे, अशी टीकाही पत्रकार परिषदेतून केली.
मालवण येथील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, उमेश मांजरेकर, निनाक्षी मेथर, किशोर गावकर, अक्षय रेवंडकर, अक्षय वालावलकर, उमेश चव्हाण, अंबाजी सावंत, आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मालवणातील सागरी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ४२ कोटीची तरतूद झाली आहे. देवबाग, वायरी, दांडी, तोंडवळी, सर्जेकोट येथे बंधारा होण्यासाठी मागणी होती, त्यासाठी आम. नाईक यांनी पाठपुरावा केला व तो यशस्वी झाला. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी मात्र टीका करत आहेत. त्यांनी बंधाऱ्याची भूमिपूजने केली मात्र एक दगडहीं अद्याप टाकू शकलेले नाही. निलेश राणे यांनी तळाशील मध्ये बंधाऱ्यांसाठी दहा दिवसात १० कोटी आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबत आजपर्यंत कोणताही पाठपुरावा झालेला नाही. हा प्रकार ४२० चा म्हणजेच लोकांना फसविण्याचा प्रकार आहे, अशी टीका खोबरेकर यांनी केली.
निधी मंजूर झाल्यावर भाजपचे पदाधिकारी बॅनरबाजी करून आपल्या नेत्यांच्या माध्यमातून निधी आल्याचे दाखवत आहेत. मात्र हा निधी आम. वैभव नाईक यांच्याच माध्यमातून आला आहे. निधी बाबत सचिवालयातील पत्रे, विविध विभागाकडे पाठपुराव्याची पत्रे आम. वैभव नाईक यांच्या नावाची असून निधी देखील आम. नाईक यांच्या नावाने आला आहे, याबाबतची पत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. निधीवर आपला दावा करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अशी पत्रे दाखवावी, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
