⚡कणकवली ता.२४-: संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.
बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.
संत निरंकारी मिशनचे सचिव जोगिन्दर सुखीजाजी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतभरात महाराष्ट्रसह 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1000 ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. प्राकृतिक जलाशय असोत किंवा मानवनिर्मित, सर्वच क्षेत्रांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरेश्वर बीच, वेंगुर्ले, मालवण जेठी ते दांडी बीच मालवण, देवगड पवनचक्की परिसर, देवगड इत्यादी ठिकाणी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
संत निरंकारी मिशनमार्फत ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान
