माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा घणाघाती आरोप;पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून साडेसहा कोटींचा विकास निधी
मालवण (प्रतिनिधी)
माजी खासदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र सुवर्णजयंती महाअभियान योजनेंतर्गत मालवण शहराच्या विकासासाठी ६ कोटी ५२ लाख रुपये एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम निलेश राणे करत असून गेल्या तीन वर्षात नगरपालिकेत एकहाती सत्ता गाजविणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक आणि आमदार यांनी मालवणसाठी किती निधी आणला ? असा सवाल विचारत मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी विकासाच्या नावाखाली मालवण शहरात सांगाडे उभे करून शहराला अधोगती कडे नेण्याचे काम माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केल्याचे घणाघाती टीका केली आहे
मालवण भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुदेश आचरेकर यांनी ठाकरे गटावर टीका केली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पूजा सरकारे, मोहन वराडकर, आबा हडकर, ललित चव्हाण, मंदार लुडबे आदी व इतर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना सुदेश आचरेकर म्हणाले, मालवण नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात पहिल्या दोन वर्षात तत्कालीन शिवसेना व भाजप युतीची सत्ता असताना शहरासाठी निधी येत होता. मात्र त्यानंतर तीन वर्षे एक हाती सत्ता ठाकरे गटाकडे गेल्यावर निधी येणे कमी झाले. केवळ ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या प्रभागात निधीचे वाटप होऊन तेथील कामे होऊ लागली. गेल्या तीन वर्षात कोणताही भरीव निधी शहराला मिळाला नाही. स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, भाजी मार्केट, नाट्यगृह परिसरातील मिनी हॉल अशा विकासकामांचे केवळ सांगाडे उभे राहिले. नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही. तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नगरपालिकेत केवळ हजेरी लावण्याचे काम केले. स्वतःच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना सुद्धा मालवण शहर विकास आराखडा कांदळगावकर रद्द करू शकले नाहीत. कांदळगावकर आणि त्यांचे नगरसेवक हे ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी, धुसफूस याच्यातच गुरफटले गेले. त्यामुळे शहर अधोगतीकडे गेले, अशी टीका आचरेकर यांनी केली.
आता ठाकरे गटातील मुके पदाधिकारीही बोलायला लागले आहेत. दांडी बंधाऱ्याचे श्रेय ठाकरे गट घेऊ पाहत आहे. मात्र दांडीवासियांना केवळ दगडी बंधारा नको असून बंधारा कम रस्ता हवा आहे, म्हणूनच त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी केली आहे. आमदार वैभव नाईक गेल्या नऊ वर्षात एक इंचही बंधारा बंधू शकले नाहीत, अशी टीकाही सुदेश आचरेकर यांनी करीत राज्यात भाजप- शिंदे यांचे डबल इंजिन सरकार आल्यावरच गेल्या सहा महिन्यात मालवणच्या विकासाला खरी सुरुवात झाली असून निधी उपलब्ध होऊन विकासकामे मार्गी लागत आहेत, याचे फुकाचे श्रेय ठाकरे गटाने घेऊ नये, असेही श्री आचरेकर म्हणाले
यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, गेल्या तीन वर्षाच्या काळात नगरपालिकेच्या दोन ते तीन प्रभागांनाच निधी मिळत होता. भाजपची सत्ता असणाऱ्या प्रभागांना निधी मिळत नव्हता. मात्र आता निलेश राणे यांनी प्रशासनाला दिलेल्या दणक्यामुळे आणि पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे शहरातील सर्व भागांना न्याय देऊन निधी मंजूर झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आम. नाईक यांनी आणलेला निधी दाखवावा. दांडी बंधाऱ्याचे श्रेय घेणाऱ्या ठाकरे गटाने बंधारा कोणत्या अर्थसंकल्पात मंजूर झाला त्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान केनवडेकर यांनी दिले.
जिओ टॉवरचे श्रेय निलेश राणेंचेच – अशोक सावंत
निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मालवण तालुक्यासाठी जिओचे चार टॉवर तर देवगडसाठी आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून चार टॉवर मंजूर झाले आहेत. मात्र ठाकरे गटाचे पदाधिकारी खोटी बातमी देऊन टॉवर खास. विनायक राऊत यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचे सांगत आहेत. मात्र, हे टॉवर मंजूर होण्यासाठी निलेश राणेंसोबत आम्ही भाजप पदाधिकारी गेले काही महिने पाठपुरावा करत आहोत. ठाकरे गटाकडून दिशाभूल केली जात आहे. बीएसएनएल टॉवर बाबतही नारायण राणे केंद्रीय मंत्रिमंडळात आल्यावरच टॉवरची यादी मंजूर झाली होती. खास. राऊत यांनी बिळवस येथील बीएसएनएल टॉवरप्रमाणे केवळ सांगाडे उभे केले, अशी टीका अशोक सावंत यांनी केली.
