तीन महिन्यांची मेहनत एका रात्रीत संपुष्टात : चवळी पिकासाठीचे कष्टही निष्फळ
⚡बांदा ता.०२-: निसर्गाच्या लहरीपणाला नेहमी सामोरे जात चवळी पिकासाठी गेले तीन महिने घेतलेली मेहनत एका रात्रीत गव्या रेड्यांनी फस्त केली. काढणीयोग्य झालेले चवळी पीक जागेवर उभे दिसत नसल्याचे विदारक दृष्य पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यामुळे वनविभाग गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने शेतात राबायचे तरी कशाला? असा आर्त सवाल पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी उपस्थित केला.
गेल्या तीन महिन्यांची मेहनत फळाला आल्याचा आनंद वाटत असतांनाच पाडलोस केणीवाडा येथे बुधवारी रात्री गव्यांचा कळप चवळी पिकात घुसला. एका रात्री रानगव्यांनी चवळी पिकाचे नुकसान केले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागावा म्हणून आम्ही दरवर्षी रब्बी पिकांसह भाजीपाला लागवड करतो. रात्री फटाके व विजेरीच्या साहाय्याने काही वेळ पिकाचे संरक्षण करतो. परंतु वनविभागाच्या अपयशामुळे मेहनत वाया जातेय याचे दु:ख वाटते. नांगरणी, पिकाची किंमत, मजुरी याची सांगड घालत दोन ते तीन हजार उत्पन्न देणारी चवळी तयार झाली होती. गवे शेतात फिरल्यानंतर बहुतांश पीक त्यांच्या मोठ्या पायाखाली तुडवले गेले. त्यामुळे आमच्या हाती पिकातील एक दाणा येताना अवघड झाले आहे. झालेल्या नुकसानिमुळे आमचे आर्थिक गणित कोलमडून गेल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
