मालवण (प्रतिनिधी)
सद्गुरू सदानंद माऊली यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त सद्गुरू सदानंद माऊली फाऊंडेशन आणि मालवण येथील डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी टोपीवाला बोर्डींग ग्राउंडवर होणार आहेत. तालुक्यातील खेळाडू मैदानी स्पर्धेत जिल्ह्याच्या अग्रभागी राहवेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती स्पर्धा संयोजक अजय शिंदे यांनी दिली.
दहा वर्षे मुलगे, मुली, १२ वर्षे ‘मुलगे, मुली, १४ वर्षे मुलगे, मुली, १७ वर्षे मुलगे, मुली अशा एकूण आठ गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १० व १२ वर्षे मुलगे, मुली गटासाठी ५० मी. धावणे, ८० मी. धावणे, लांबउडी, उंचउडी, ८० बाय ४ रिले, १४ वर्षे मुलगे, मुली गटासाठी ४०० मी. धावणे, २०० मी. धावणे, १०० मी. धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी, १०० बाय ४ मी. रिले, तर १७ वर्षे मुलगे, मुली गटासाठी १५००, ८००, ४००, २००, १०० मी. धावणे, ४ बाय १०० मी. रिले, वॉकिंग तीन किमी, गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी, उंचउडी आदी प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३००, २००, १०० रुपये, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वा. मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल. जन्म पुरावा म्हणून आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र व शाळेचे ओळखपत्र स्पर्धास्थळी असणे अनिवार्य आहे. स्पर्धा प्रवेश अर्ज ६ फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक अजय शिंदे (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
