आचरेतील ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा प्रतिसाद

श्री रामेश्वर वाचन मंदिरचे आयोजन : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

⚡मालवण ता.०१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, नाटक, संदर्भग्रंथ, विज्ञान, इतिहास, प्रवास, बालसाहित्य अशी विविध दर्जेदार पुस्तके मांडण्यात आली होती. ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन माजी सरपंच अनिल करंजे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासनाच्या नियमानुसार राज्यात १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यादृष्टीने अनेक संस्था, वाचनालये, मराठी भाषेचा प्रचार होण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करतात. त्याच पार्श्वभूमीवर श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी उपाध्यक्ष भिसळे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस हार घालून बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अशोक कांबळी यांनी नेताजींच्या जीवनचरित्राच्या पुस्तकाचे अभिवाचन केले.

ग्रंथपाल विनिता कांबळी यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचक सभासदांच्या मुलाखती घेतल्या. यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अनेक उपक्रम सुचविण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी भाषेचा प्रचार व्हावा, सर्वांनी आपल्या बोलण्यात मातृभाषेचाच वापर करावा, अशा प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केल्या. या ग्रंथप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page