आंगणेवाडी यात्रेदिवशी भोगलेवाडी येथे भाजपचा आनंद मेळावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज राहणार उपस्थित:सरपंचांचा करण्यात येणार सत्कार:जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

मालवण ता.२९-: आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती यात्रोत्सवाला लाभणार असून आंगणेवाडी भोगलेवाडी येथील माळरानावर भाजपचा जो आनंद मेळावा होणार आहे त्या आनंद मेळाव्याला ही मंडळी संबोधित करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने १८० फूट लांब आणि ८० फूट रुंदीचे भव्य स्टेज उभारण्यात येत असून जिल्हाभरातील ३०० पेक्षा जास्त ग्रामपंचायती मध्ये भाजपचे सरपंच निवडून आल्याने या निवडून आलेल्या सरपंचांचा तसेच इतर लोकप्रतिनिधीचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी दिली. या पत्रकार परिषदेत श्री. तेली यांनी येत्या दोन वर्षात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात भरीव काम होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आंगणेवाडी भोगलेवाडी तिठा येथे भाजपच्या ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाजपच्यावतीने होणाऱ्या आनंद मेळाव्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. तेली हे बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष  धोंडी चिंदरकर,बाबा परब, महेश बागवे, गणेश आंगणे महेंद्र चव्हाण, संतोष गावकर, विजय केंनवडेकर ,गणेश कुशे,आपा लुडबे,सुशांत घाडीगांवकर संतोष साटवीलकर राजू परुळेकर, राजन गावकर, दीपक सुर्वे विलास मेस्त्री, ललित चव्हाण, सौ लक्ष्मी पेडणेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्री तेली म्हणाले,
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा  जत्रोत्सव ४ फेब्रुवारी रोजी होत असून या जत्रोत्सवास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे उद्योग मंत्री नारायण राणे, तसेच आमदार  आशिष शेलार , प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक नेते, मंत्री आंगणेवाडी येथे येत आहेत. जिल्ह्यातील  सुमारे 300 पेक्षा जास्त ग्रामपंचायत मध्ये भाजपचे सरपंच सध्या कार्यरत आहेत तसेच अनेक नगरपंचायत, जिल्हा बँक, खरेदी विक्री संघ, अर्बन बँक यावर सुद्धा भाजपचीच  सत्ता आहे. पार्लमेंट टू पंचायत’ ही संकल्पना पूर्ण करण्यात आली आहे.

पुढील कालावधीत कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा या ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने एक आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक सोहळा असणार असून सदर आनंद मेळावा ४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर चार ते सात या वेळेत घेण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील जनतेने आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही  याची खबरदारी घेऊन  सहभागी होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

ते पुढे म्हणले,  जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना,  उद्योग मंत्री नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात होत आहे. पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने भाजपचे आभार व्यक्त करावे यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव देवीच्या साक्षीने करताना भाविकांना किंवा यात्रा परिसरात कोणाला त्रास होणार नाही यासाठी कार्यकर्ते काळजी घेणार आहेत.  पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने आंगणेवाडी परिसरातील नऊ रस्ते पूर्ण होत आहेत. वीज वितरणची लाईन सुद्धा अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी जत्रा परिसरात असणार आहेत.   कुठलीही निवडणूक पुढे नसताना हा भाजपचा आनंद मेळावा होत आहे. यावेळी पाचशे माणसे एकाच वेळी स्टेजवर असतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे.  सिवर्ल्ड, नाणार प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या प्रकल्पाना चालना मिळणे आवश्यक आहे.अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावे यासाठी  मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आई भराडीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्यामुळे त्यांचे सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात भरून ठेवणारा असणार आहे. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले.

You cannot copy content of this page