चार दिवस चालणार: आजच्या बैठकीत झाला निर्णय
⚡मालवण ता.२९-:.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्य आणि देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या गाबित लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय गाबित समाज महासंघाच्या वतीने येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस ‘गाबित समाज महोत्सवा’चे आयोजन होणार आहे. चार दिवस हा महोत्सव चालणार असून महोत्सवाच्या माध्यमातून समाजाची एकजूट दाखवत समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न होणार असल्याचे आज मालवणात झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत येथे पार पडलेल्या बैठकीत दांडी समुद्रकिनारी गाबित समाज महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाची रुपरेषा आणि नियोजनासाठी रविवारी मामासाहेब वरेरकर नाट्यगृहात जिल्ह्यातील गाबित समाजाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आदींची संयुक्त बैठक बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय संघटक चंद्रशेखर उपरकर, महासंघाचे उपाध्यक्ष अॅड. काशीनाथ तारी, कोषाध्यक्ष नारायण आडकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्ष चारुशीला आचरेकर, देवगड तालुकाध्यक्ष संजय पराडकर, उपाध्यक्ष लक्ष्मण तारी, वेंगुर्ले सचिव नागेश गावकर, जिल्हा नियोजन सदस्य हरी खोबरेकर, बाबा मोंडकर, सेजल परब, बाबी जोगी, दिलीप घारे, भाऊ मोरजे, अन्वय प्रभू रश्मीन रोगे, धर्माजी आडकर, नरेश हुले, गंगाराम आडकर आदी उपस्थित होते.
या बैठकीस उपस्थित सर्वांच्या वतीने खोबरेकर यांनी गाबित समाज महोत्सवाचे स्वागत केले. महोत्सव यशस्वीतेसाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महोत्सवात मालवणी खाद्य महोत्सव गाबित समाजाच्या चालीरीती- रितीरिवाज, शिमगोत्सव परपरा आदींबरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाची अंतिम रुपरेषा निश्चित करण्यासाठी विविध समित्या गठीत केल्या जाणार आहेत. त्याकरीता लवकरच अजून एका जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा कार्यकरिणी पुनर्गठन १२ रोजी
एवढा मोठा कार्यक्रम जर समाजाच्या वतीने घेतला जाणार असेल तर समाजाची जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्रगठन आवश्यक आहे. सध्या जिल्हा कार्यकारिणी अस्तित्वात नाहीय. त्यामुळे लवकरात लवकर नवी कार्यकारिणी नियुक्त करावी, असे आवाहन यावेळी बाबा मोंडकर यांनी केले. त्यानुसार येत्या १२ फेब्रुवारी रोजी मालवणात जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक आयोजित केली जाईल, असे उपरकर यांनी स्पष्ट केले.
