खा विनायक राऊत पुन्हा खोटे बोलले,भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आरोप
⚡मालवण ता.२९-: आंगणेवाडी साठी मंजुरी मिळालेल्या देऊळवाडा येथील तलाव कामासाठी जमीन जात असलेल्या शेतकऱ्यांना अकरा कोटीचा निधी हा मोबदला म्हणून आपण आणल्याची माहिती विनायक राऊत यांनी काही दिवसापूर्वी आंगणेवाडी येथे दिली होती. नेहमीप्रमाणे खोटं बोलण्याचं काम विनायक राऊत यांनी त्यावेळी केलं. सदर रक्कम ही ११ कोटी नसून साडेसहा कोटी आहे व ती रक्कम ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांजवळ जमा झाली आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झालेली असून यामध्ये विनायक राऊत यांचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहणार असून ठेकेदार व विनायक राऊत यांचा काय संबंध आहे हे लवकरच उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी आंगणेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केला .
आंगणेवाडी येथे ४ फेब्रुवारी ला होणाऱ्या भाजपच्या आनंद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येथील धरण कामाच्या बाबत दिलेल्या खोट्या माहितीचा पोलखोल केला.
श्री राणे म्हणाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देऊलवाडा येथील तलावाचे भूमिपूजन झाले होते व त्यानंतर एक दमडीही येथील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने येथील शेतकऱ्यांना कणकवली रेस्ट हाऊस येथे दमदाटी केलेली आहे. देवीच्या ठिकाणी खासदार विनायक राऊत हे खोटे बोलत आहेत. अशी खोटी माहिती देण्याचा विनायक राऊत यांना अधिकार नाही. आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहणार असून ठेकेदार व विनायक राऊत यांचा काय संबंध आहे हे लवकरच उघड करणार असल्याची माहिती यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी दिली.
मालवण नळपाणी योजनेच्या ४० कोटी रुपयांची निविद मॅनेज झाली असल्याच्या आरोपाचा यावेळी डॉ. निलेश राणे यांनी पुनरुच्चार करत आमदार वैभव नाईक, नगरसेवक मंदार केणी तसेच आणखीन काही पदाधिकाऱ्यांचा यामध्ये हात असून येत्या दहा दिवसात भ्रष्टाचार कसा झाला याबाबत आपण सर्व माहिती जनतेसमोर ठेवणार आहे. हे ४० कोटी मालवणच्या जनतेसाठी असून लोकप्रतिनिधी डाका घालायला लागले तर लोकांनी कोणाकडे पहावे? याबाबत मंत्रालय तसेच मालवण नगरपालिका यांचे आपण लक्ष वेधले आहे. नव्याने निविदा काढण्यासाठी आपला पाठपुरावा राहणार असल्याचे निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी साठी यावर्षी ते स्वतः देवी भराडीचे भक्त असल्याने शासनाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने स्वतः लक्ष घालून आंगणेवाडीसाठी काम केले आहे. आंगणेवाडी मंडळाने मागितलेली गोष्ट पूर्ण करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. याबद्दल डॉ. निलेश राणे यांनी पालकमंत्री
रवींद्र चव्हाण यांना यावेळी धन्यवाद
दिले. यावेळी विजय केनवडेकर, गणेश कुशे, माजी सरपंच महेश मांजरेकर, वेरली सरपंच धनंजय परब, पळसंब सरपंच महेश वरक, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, निलेश खोत, संतोष लुडबे, माजी जी प सदस्य संतोष साठविलकर, संतोष पालव, भाई मांजरेकर, संतोष गावकर, दत्ता वराडकर, विलास मेस्त्री, राजू परळेकर तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते
